श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.26 – आषाढी एकादशी दि.17 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.त्यानुसार दि.07 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे श्रींची काकडा आरती, पोषाख,धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत दि 26 जुलै बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.

दि. 26 जुलै रोजीच्या मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रीं ना पहिले स्नान घालण्यात आले.श्रींचा पलंग शेजघरामध्ये ठेवण्यात आला.तसेच श्रींचे सुरू असणारे 24 तास दर्शन बंद होऊन आता सर्व नित्यराजोपचार सुरू होत आहेत.
श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची प्रक्षाळ पुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य श्री अतुलशास्त्री भगरे गुरूजी व ह.भ.प.श्री. शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणी मातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत.
या पूजेच्या वेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख संजय कोकीळ व अतुल बक्षी उपस्थित असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.