श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथील उपहारगृह मंदिर समिती मार्फत सुरू – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
भाविकांना मिळणार माफक दरात उत्तम भोजन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28/06/2024- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात भक्ती मार्गावर सुसज्ज अशा श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासची उभारणी करण्यात आली आहे.या भक्तनिवास मध्ये उपहारगृहाची देखील निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे उपहारगृह चालविण्यास देणेकामी ई लिलाव राबविण्यात आला होता. तथापि सदर ई लिलावातील सर्व लिलावधारकांनी माघार घेतल्याने सदरचे उपहारगृह मंदिर समिती मार्फत प्रायोगित तत्वावर चालविण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार आज शुक्रवार दिनांक 28 जूनपासून मंदिर समिती मार्फत उपहारगृह सुरू करण्यात आले असून भाविकांना माफक दरात उत्तम भोजन मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या उपहारगृहाचे उद्घाटन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख बलभिम पावले, सहायक विभाग प्रमुख धनंजय कोकीळ व सावता हजारे उपस्थित होते.या उपहारगृहा मध्ये चहा,नाष्टा व भोजन माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.