श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार दि.10 फेब्रुवारी रोजी दु. 3 ते 5 या वेळेत श्री विठ्ठल सभामंडपात चक्रीभजन संपन्न झाले.

सदर चक्रीभजन सदगुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले.यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच सुमारे एक हजार ते दीड हजार भाविक उपस्थित होते.शके 1718 पासून आजतागायत चक्रीभजनाची परंपरा देगुलरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थानचे मुळ पुरुष सदगुरु विरनाथ महाराज यांना मिळाली.चक्रीभजन म्हणजे संसाराच्या चक्रातून,भयातून मुक्त करणारे भजन आहे. या परंपरेमध्ये काही बसून तर काही उभारुन भजन केले जाते.हे भजन नृत्य करत केले जाते.देहाची विदेही अवस्था प्राप्त करून देते.

औसेकर घराण्याची 1792 सालापासून माघ वारी काळात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्री भजनाची परंपरा अखंडपणे देण्याची सेवा औसेकर घराण्यातून केली जाते.या चक्री भजनाच्या माध्यमातून 14 भजनं म्हटली जातात. चक्री भजनामध्ये वारकरी संप्रदाय पूर्णपणे रंगून जातो असे औसा संस्थांनचे अध्यक्ष तथा मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
मंदिर समितीने मंदिरात होणारे मोठे सोहळे, कार्यक्रम विविध समाज माध्यमात लाईव्ह करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सदर सोहळा मंदिर समितीचे अधिकृत संकेत स्थळ, युट्युब व फेसबुक यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला होता. त्यामध्ये हजारो भाविकांनी घरबसल्या सोहळा अनुभवला असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
