किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्‍या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण

किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कौतुक

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड व वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणार्‍या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण करण्यात आले.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड (दक्षिण) येथे टाटा पॉवर यांच्या कार्यान्वयन सहकार्याने निर्मित मिडियन लँडस्केपचे उद्घाटन केले आणि येथील रोपट्यांना पाणी घातले.

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवार दि. २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तरवाहिनीचे लोकार्पण होत असून या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हे सुशोभीकरण मे.टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top