मकरसंक्रांत निमित्त महिला भाविकांच्या दर्शनासाठी सुलभ नियोजन – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पुरूष भाविकांनी मुखदर्शन घ्यावे,मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आवाहन
हा उत्सव मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,सदस्या शकुंतलाताई नडगिरे व ॲड.माधवीताई निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार- व्यवस्थापक मनोज श्रोत्री

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे.मकरसंक्रांतीच्या उत्सवा निमित्त भोगीला म्हणजे दि.13 जानेवारी रोजी श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 3.00 ते 4.30 या वेळेत करण्यात येणार असून, माता व भगिनींना श्री रूक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे 4.30 ते 5.30 या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे 5.30 नंतर श्री रूक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील व सकाळी 06.30 वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि.13 जानेवारी रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 4.30 ते 5.45 या वेळेत होऊन,पदस्पर्श दर्शन पहाटे 06.00 नंतर सुरू करणेत येणार आहे.दि.14 जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांती निमित्त श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झालेनंतर श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान केलेनंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच दि.15 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे श्री रूक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार असून दि.14 जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्त जास्तीत जास्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरीता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, ऑनलाईन दर्शन बुकींग व्यवस्था बंद, चांगली स्वच्छता व्यवस्था, व्हिआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदरचा उत्सव मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच सदस्या शकुंतलाताई नडगिरे व ॲड.माधवीताई निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
