विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा… डॉ.नीलम गोर्हे
गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है, सभापतीपदी राम शिंदेंची निवड उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गजलेतील ओळी सादर करत व्यक्त केली भावना

नागपूर ,दि.१९/१२/२०२४ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड करण्यात आली.विधानपरिषदेमध्ये आज सभापती पदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधानपरिषद सभापतीपदी निवड करण्यात आली. विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दुनिया जिसे कहते है ,जादू का खिलौना है… मिल जाये तो मिट्टी है ,खो जाये तो सोना है, गम हो कि खुशी दोनो कुछ देर के साथी है… मला असं वाटतं यासंदर्भामध्ये सातत्याने शिवसेनेचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला पहिल्यांदा आमदारकी मिळाली त्यावेळी सांगितलं होतं की, काम करत असताना श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. त्यावर माझा विश्वास आहे आणि त्यानुसार मी काम करत आहे.त्याआधाराने तुमचं सर्वांचं प्रेम, सहकार्य या सगळ्यामधून हे सर्व घडत असतं याची मला जाणीव आहे. पण तरीसुद्धा जोपर्यंत आमचे एकनाथ शिंदेजी माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मी खंबीर आहे.
त्यानंतर सभागृहात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,अतिशय संघर्षाच्या काळामध्ये नीलमताईंनी उपसभापती म्हणून आणि पिठासीन सभापती म्हणून या सभागृहामध्ये काम केलं.सभागृहामध्ये काम करत असताना डॉ.नीलमताई यांचे निर्णय पिठासीन अधिकारी म्हणून समतोल होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये नीलमताईंनी आवश्यक असेल तेव्हा कणखर भूमिका घेतली. तसेच इतर वेळीही सर्वांना संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पद केवळ सभेचे संचालन करण्याचे पद नाही पदाच्या माध्यमातून राज्याला आवश्यक अशी दिशा देता येते व शासनास निर्देश देता येतात हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी नीलम ताईंनी केलं. यामुळे आजच्या या निमित्ताने मी नीलमताईंचं अभिनंदन करतो. एक चळवळीतून आलेली आमची भगिनी उपसभापती या पदावर बसल्यानंतर किती उत्तम काम करू शकते हे निश्चितपणे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नीलमताईं विषयी गौरवोद्गार काढताना म्हणाले की कठीण काळात आमच्या डॉ.नीलमताई गोऱ्हेंनी उपसभापती पदावरून सभागृहाचे कामकाज अतिशय समर्थपणे आणि उत्तमपणे सांभाळलं.अनेक लोकाभिमुख निर्णय नक्कीच घेतले ते महिलांचे सन्मान वाढवणारे आहेत. जेव्हा जेव्हा महिलांवर अन्याय,अत्याचार होतात तेव्हा त्या धावून जातात आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका घेतात. खऱ्या अर्थाने अनेक चांगले निर्णय या सभागृहामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये झाले.