238 कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी,एका चार्टड अकाउंटटकडून वसुलीचे आदेश ?
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 238 कोटींच्या बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी,एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43 लाख 999 हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जारी केले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात 2010 साली बार्शी चे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती.त्यांच्या तक्रारीनंतर कलम 83 आणि 88 नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले होते. संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले.मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालत ठेवण्यात आला होता.त्यामुळे या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी आणि चार्टड अकाउंटट यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते.
या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य आमदार दिलीप सोपल, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,माजी आमदार सर्वश्री दिलीप माने,बबनदादा शिंदे,संजय शिंदे,सुधाकरपंत परिचारक,रश्मी बागल,चंद्रकांत देशमुख, प्रतापसिंह मोहिते पाटील,जयवंत जगताप, रामचंद्र वाघमारे,बबनराव आवताडे, भैरु वाघमारे,अरुण कापसे,राजशेखर शिवदारे, सुनील सातपुते,रामदास हक्के,सुरेश हसापुरे, संजय कांबळे, सी.ए.संजीव कोठाडिया यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना वसुलीसाठी नोटिसा मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
