सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांची फसवणूक करणार्या तोतया इसमावर गुन्हा दाखल
मंदिर समितीकडून करण्यात आला गुन्हा दाखल
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात शंकर चनाप्पा भोसले हा इसम मंदिर समितीच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकाचा पेहराव घालून भाविकांकडून पैसे घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन देतो असे सांगून भाविकांची फसवणूक करताना दिसून आल्याने त्याच्यावर मंदिर समिती मार्फत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता दर्शनरांगेतील स्थानिक नागरिक / दुकानदार मीनाक्षी जोशी यांना एक इसम कासार घाट येथे दर्शनबारीत संशयरीत्या तिथे उभा असल्याचा दिसून आला व तो भाविकांना तुम्हाला दर्शन करून देतो, असे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेत असताना निदर्शनास आल्याने त्यांनी मंदिर समितीचे तेथील कर्मचारी रोहित दगडू जानगवळी व ऋतिक कल्याण काळे यांना कळवले. तद्नंतर माहिती घेऊन संबंधित इसम शंकर चन्नप्पा भोसले रा.रांजणी ता.पंढरपूर यांचेवर मंदिर समितीचे सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम मारुती ढगे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318 (4) व 319 (2) अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिर समितीच्यावतीने असे आवाहन करण्यात येते की, श्रींचे दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.दर्शन हे संपूर्णत: निशुल्क आहे.त्यामुळे भाविक भक्तांनी कोणासही श्री चे पदस्पर्श दर्शना साठी आर्थिक व्यवहार करू नये. तसेच अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची माहिती कार्यालयास तात्काळ द्यावी.मंदिर समिती अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करेल, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.