पंतप्रधान आहेत पळणारा चित्ता ,म्हणून ते गिरवत आहेत विकासाचा कित्ता — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22- मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहेत. आत्ता.. मग का येणार नाही राज्यात महायुतीची सत्ता ? पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता” अशी कविता सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे स्वागत केले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयोजित जाहीर सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.

यावेळी बोलताना ना.रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली. तुकड्या-तुकड्यात विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बरोबर यावं. त्यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं. मी दुसरं कोणतही पद घ्यायला तयार आहे. मी त्यांना मोदींकडे घेऊन जाईल. आम्ही दोघंही एकत्र येऊ,सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ, असे मिश्किल भाष्य ना.रामदास आठवले यांनी केले.

अकोल्यात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे) नेते आनंदराव अडसुळ उपस्थित होते.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. या सभांमध्ये राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आताच आता रामदास आठवले यांनीही त्यांच्या कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.अकोल्यात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना, रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला.
