पंढरपूरात पक्षीनिरीक्षण सप्ताह निमित्त पक्षी निरीक्षण संपन्न
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/११/२०२४- आद्य पक्षी निरीक्षक डॉ.सलीम अली व थोर अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाने दि.05 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर अखेर पक्षी निरीक्षण सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या निमित्ताने पंढरपूर सायकल असोसिएशन च्यावतीने यमाई तलावावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती व युवा नेते उमेश परिचारक उपस्थित होते.

यावेळी पंढरपूर येथील पक्षी निरीक्षक श्रीकांत बडवे सर व व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी यमाई तलाव परिसरातील पक्षी वैभव व सद्यस्थिती याची माहिती करून दिली.

यावेळी श्रीकांत बडवे यांनी परिसरातील विविध पक्षी, त्यांचे अधिवास, खाद्य सवयी व जीवन पद्धती याची सविस्तर माहिती दिली.पंढरपूर येथील यमाई तलाव हा पक्षी निरीक्षणासाठी एक आदर्श ठिकाण असून या परिसरात 144 स्थानिक पक्षांच्या नोंदी असल्याचे सांगितले. तसेच या तलावावर दरवर्षी शेकडो स्थलांतरित बदके व चिखल पायटे, बाबलर, मोठ्या संख्येने येतात. या निरीक्षणा दरम्यान श्री श्रीकांत बडवे यांनी आज 42 पक्षांची प्रत्यक्ष तलावावर नोंदी केल्या असून यामध्ये रंगीत करकोचा, राखी बगळा, जांभळा बगळा, पाणकोंबडी, गाय बगळा, ग्लॉसी आयबिझ, टिटवी, वेडा राघू, गप्पीदास, खंड्या, नदीसुर, चिरक, धोबी, पाकोळी, वारकरी बदक,खाटीक, होला, ब्राम्हणी घार, सुतार, रातबगळा, आदी पक्षांच्या नोंदी केल्या व प्रत्यक्ष दुर्बिणीच्या साह्याने पक्षी निरीक्षण केले.

यावेळी सर्वांनी यमाई तलाव परिसरातील बेकायदेशीर धंदे बंद व्हावेत, पोलीस गस्त असावी याबाबत युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्याकडे आपले मत व्यक्त केले. नैसर्गिक अधिवास कायम ठेवावा असे सुचविले.

यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक दीपक शेटे, व्यापारी प्रकाश शेटे,पक्षीनिरीक्षक श्रीकांत बडवे,व्ही.एम.कुलकर्णी सर,महेश भोसले सर सूरज अष्टेकर,अभिजीत कुलकर्णी, चि.सार्थक कुलकर्णी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर सायकल असोसिएशनच्या वतीने प्रकाश शेटे व सुरज अष्टेकर यांनी केले होते.या पक्षी निरीक्षण सप्ताहात यमाई तलाव परिसरात पक्षी निरीक्षण संपन्न झाले याचा मनस्वी आनंद पक्षीमित्र व्ही एम कुलकर्णी सर यांनी व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.