रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा, नाराजी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा,नाराजी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजप महायुतीला विजयी करायचे आहे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटपामधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे.राज्यभरात ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत.रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीला विजयी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले आहे.

भाजप,रिपब्लिकन पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी महायुती राज्यात विधानसभा निवडणूक एकजुटीने लढत आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे महायुती चे नेते आहेत.त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी केलेले आवाहन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी तात्काळ उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला पाठिंबा द्यावा.महायुती च्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी नाराजी बाजूला सारून एकजुटीने महायुतीचा प्रचार करावा.जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला असून त्यामुळे नाराजी पसरली आहे हे खरे असले तरी भाजप नेतृत्वाने महायुती चे सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्तेत सहभाग देण्याचे ठोस आश्वासन दिले असल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पक्षाची पुढील वाटचाल लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ना.रामदास आठवलेंनी दिलेल्या आदेशाचे पालन करून राज्यात महायुतीच्या उमेदवारांचा एकजुटीने प्रचार करावा.ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी तात्काळ उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असा ना.रामदास आठवले यांचा आदेश असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top