श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८ – श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे नं ५९ येथे श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास आहे. या भक्त निवासामध्ये खोली बुकींगसाठी https://yatradham.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन पध्दतीने काऊंटर बुकींग सुविधा देखील आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाचे नावाने https://shrivitthalrukminibhaktaniwas.in/ असे बोगस (फेक) संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करून त्यावरील मो.९०४५०३३७१९ वरून खोल्या बुकींग केल्या जातात असे सांगुन भाविकांचे पैसे स्विकारले आहेत आणि त्यांना त्याची पावती दिली गेली आहे. दि.०६/१०/२०२४ पासुन अशा भाविकांनी भक्तनिवास येथील दुरध्वनी वर संपर्क केला असता सदर बाब निदर्शनास आली आहे. काही भाविक भक्तनिवास येथे प्रत्यक्ष वास्तव्यास आले असता त्याबाबत फसवणूक झाल्याची माहिती मिळाली.
यास्तव यापूढे भाविकांची फसवणूक होऊ नये तसेच फसवणूक झालेल्या भाविकांना न्याय देण्याच्या दॄष्टीने संबंधीतावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस ठाणे पंढरपूर शहर व https://cybercrime.gov.in/ यांचे कडे मंदिर समितीच्यावतीने लेखी तक्रार देणेत आली आहे.
तरी भाविकांनी https://yatradham.org या संकेत स्थळावरून किंवा ऑफलाईन पध्दतीने खोली काऊंटर बुकींग करावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले.