सार्थक शिंदे यांच्या पहाडी आवाजाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिला सुंदर प्रतिसाद
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित गणेशोत्सव संगीत महोत्सव
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम भवन येथे श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात तिसरे पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक छोटे उस्ताद सार्थक शिंदे यांनी गुंफले.
सुरुवातीला सदस्य श्री प्रकाश महाराज जवंजाळ,सदस्या ॲड.माधवी निगडे ताई, शकुंतला नडगिरे ताई,व्यवस्थापक मनोज श्रोत्री,सार्थक शिंदे,विजय शिंदे यांच्या हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सुरुवातीला जगी जीवनाचे सार या पहिल्याच गाण्याने टाळ्यांचा ताल धरला.पुढे या पंढरपूरात वाजत गाजत, चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवरी,चल ग सखे चल ग सखे पंढरीला,चिक मोत्याची माळ,कन्हैया रे,वेडा रे वेडा पंढरी, आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव,बाजाराला निघण्या निघाली गवळणी अभंगांनी वातावरण भक्तीमय करत एवढ्या लहान वयात आपल्या पहाडी आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना तितकीच सुंदर साथसंगत तबला समर्थ उकरंडे , पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनिअम श्रीहरी मेंदरकर ,ढोलकी महेश कांबळे,स्वर व टाळ क्रांती शिंदे,संगीता भंडारे यांनी केली.यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी ,अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले. पुढे तीनही दिवस ख्यातनाम कलाकारांच गायन ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचेवतीने करण्यात आले आहे.