महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही
सांगोला / ज्ञानप्रवाह न्यूज- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी मॅनेज झाल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीला मताधिक्य मिळाले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकदिलाने काम केले असते तर २५ ते ३० हजाराचे लीड मिळाले असते. तालुक्यात शिवसेनाच विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. सांगोला विधानसभेची शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे लढवली जाईल. लवकरच याबाबत पक्षाचे शिष्टमंडळ जावून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींना भेटणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. सांगोला येथे सोमवार ९ सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे बोलत होते.
या पत्रकार परिषदेसाठी अरविंद पाटील, जेष्ठ नेते कमरुद्दिन खतीब, युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले, शिवसेना विधानसभा समन्वयक शंकर मेटकरी, शहरप्रमुख तुषार इंगळे, उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की, सांगोला विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या वतीने निश्चितपणे लढवली जाईल. आमचा उमेदवार तयार असून मागील विधानसभेत पक्षाने उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केल्याने त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवली जाईल. सांगोल्यात सध्या कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणला असल्याचे सांगितले जात असले तरी टक्केवारीमुळे अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, शहर प्रमुख तुषार इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
लोकसभेला काही नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांशी संधान साधून मॅनेज झाले आणि त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही.याबाबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांजवळ त्यांची तक्रारही केली आहे.तालुक्यात उघडपणे अवैध धंदे व भ्रष्टाचार सुरू असताना येथे आमदारकीचे स्वप्न पाहणारे नेतेमंडळी डोळेझाक करीत आहेत.तालुक्यातील अवैद्य धंद्याबाबत शिवसेनेनेच आवाज उठवत सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले.