जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.१७- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मायमराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथे ७० वर्षानंतर होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत भेट देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याच नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, दिल्लीत साहित्य संमेलन होणे ही महाराष्ट्रा साठी,मराठी साहित्यप्रेमीं साठी एक अभिमानाची बाब आहे.अशा संमलेनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे मोठेपण जगभरातील नागरिकांना कळायला हवे. साहित्यिकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे,जीवनाचा अर्थ त्यांच्यामुळे कळतो, नवी पिढी घडवितांना साहित्यिक समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य साहित्यिक करतात.म्हणून अशा साहित्य संमेलनाचा समाज जागराणासाठी उपयोग होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले,देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या आयोजनाला विद्येच्या माहेरघरातून सुरूवात होत आहे.मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून सत्तेच्या राजधानीपर्यंत मायमराठीचा डंका वाजतो आहे. संमेलनाच्या तयारीची सुरूवात चांगली झाली असून या संमेलनाला काही कमतरता भासणार नाही. जगातल्या १२ कोटी मराठी नागरिकांना जोडणारे हे संमेलन आहे. परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृतीचा मराठी भाषेचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसांचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव ७० वर्षानंतर दिल्लीत होत आहे.

संत नामदेवांनी मराठीचा झेंडा भक्तीमार्गाने पंजाबपर्यंत नेला होता. मराठी राज्यकर्त्यांनी देशभर पराक्रम गाजविला. मराठी माणसे जेथे गेली तिथे त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती रुजविण्याचे कार्य केले.इंदोर, ग्वाल्हेर,हैद्राबाद, तंजावर आदी भागात मराठी संस्कृती रुजलेली दिसते. सरहद संस्थेच्या माध्यमातून राज्याची सरहद्द ओलांडून मायमराठी राष्ट्रीय पातळीवर जात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी भाषिकांचा हा सोहळा अनुभवता येणार आहे. हे संमलेन यशस्वी होण्यासाठी शासन संस्थेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर योजनांसोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा आपला अभिमान असल्याने त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन ते प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी सरहद संस्थेतर्फे जम्मु काश्मिरमध्ये करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

डॉ.निलमताई गोऱ्हे म्हणाल्या, मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा महाराष्ट्रात एकमताने मंजूर झाला. गेल्या दोन वर्षात ज्या शाळेमध्ये मराठी शिक्षक नसल्याने मराठी शिकवले जात नव्हते त्या शाळांमध्ये मुलांना मराठीचे अध्ययन करता यावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.दुकानाच्या पाट्या मराठी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी साहित्य परिषद म्हणजे मराठी भाषा भवनच आहे.भारतातील मराठी प्रेमींना जोडून घेण्यासाठी सरहदचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे दिल्लीतील हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या स्थळ निवडीबाबत प्रक्रिया सांगून संमेलनाचा निधी ५० लाखाहून वाढवून २ कोटी केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. संजय निहार यांनी सरहद संस्थेच्या कार्याची माहिती देऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top