स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे म्हणतात, 'टोकियोत गमावलं पण पॅरिसमध्ये कमावलं'


Kolhapur's Swapnil Kusale
गुरुवारी 1 ऑगस्टला कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. 50 मीटर 3 पोझिशन्स रायफल प्रकारात त्याने भारतातर्फे मिळवलेलं हे पहिलं ऑलिंपिक पदक आहे.

 

स्वप्नीलच्या या यशामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

 

दीपाली देशपांडे या त्याच्या प्रशिक्षक आहेत. टोकियो ऑलिपिंकमध्ये मोठ्या अपेक्षा असतानाही भारताचा नेमबाज संघ रिकाम्या हाताने परतल्यावर राष्ट्रीय पातळीवरच्या एक प्रमुख प्रशिक्षक असणाऱ्या दीपाली यांना पदावरुन बाजूला व्हावे लागले होते.

 

स्वप्नीलला कांस्य पदक मिळाल्यावर त्या म्हणाल्या, स्वप्नीलचं हे पदक संपूर्ण भारत देशासाठी एक मोठं यश आहे. यासाठी आम्ही भरपूर कष्ट घेतले आहेत आणि यापुढेही नेमबाजांकडून पॅरिस ऑलिपिंकमध्ये यशाची अपेक्षा करत आहोत.

 

दीपाली यांनी 2004 साली अथेन्स येथे झालेल्या ऑलिपिंकमध्ये सहभाग घेतला होता. स्वप्नीलबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, स्वप्नील एक शिस्तबद्ध आणि कष्टाळू नेमबाज आहे. त्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आता ऑलिपिंक पदक मिळवेपर्यंतचा त्याचा प्रवास मी पाहिला आहे.

टोकियोत काय झालं?

पॅरिस ऑलिपिंक्स आधी भारतीय नेमबाजांना पदकापर्यंत जाण्याची संधी 2012च्या लंडन ऑलिपिंकमध्ये मिळाली होती. त्यानंतर सलग दोन ऑलिपिंक खेळांत भारतीय नेमबाजांना पदक मिळालं नाही.

 

2020 सालच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय नेमबाजांना यश मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. तेव्हा दीपाली राष्ट्रीय प्रशिक्षक होत्या.

 

टोकियोत असामाधानकारक कामगिरीमुळे त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती आणि त्यांना आपलं पद गमवावं लागलं होतं.

त्या सांगतात, “तो माझ्या नेमबाजीच्या प्रवासातला सर्वांत वाईट काळ होता, एक खेळाडू म्हणून आणि एक प्रशिक्षक म्हणूनही तो वाईट काळ होता. पराभव व्हावा असं कोणालाच वाटत नसतं पण काही कारणानं आमचे नेमबाज पदक मिळवू शकले नाही. आणि मी अनेक बळीच्या बकऱ्यांपैकी एक ठरले.”

टोकियोमधल्या अनुभवानं मी आतून कोसळले होते. मला अतीव दुःख झालं होतं. माझ्या पतीने मला पुन्हा माझी गाडी रुळावर आणण्यासाठी मदत केली. आणि अमिताभ बच्चन यांच्या खुदा गवाह सिनेमातील संवाद- जिंदगी और मौत का फैसला तो आसमानोंपर है, इतना मत सोच. सोच गहरी हो जाये तो फासले कमजोर हो जाते हैं, यामुळे मला ऊर्जा मिळाली. त्यानंतर मी टोकियो ऑलिंपिकवर अतिविचार करणं सोडलं आणि पॅरिस ऑलिपिंकवर लक्ष केंद्रित केलं.”

भारतीय नेमबाजसंघात दीपाली यांचे स्वप्नील कुसळे, सिफ्तकौर सामरा आणि अर्जुन बाबुता हे खेळाडू सहभागी झाले आहेत.

 

“टोकियोनंतर जवळपास दोन वर्षं त्या ऑलिपिंकसंदर्भातील फोटोही पाहाण्याचं बळ माझ्यात नव्हतं. त्या आठवणी कायमच्या नष्ट व्हाव्यात असं मला वाटत होतं. माझ्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिपिंकच्या चमूत प्रवेश मिळवायला सुरुवात केल्यानंतर मी टोकियो ऑलिपिंकच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. अगदी फोटोही पाहू लागले. एक नेमबाज म्हणून ऑलिपिंकमध्ये प्रवेश करणं किती मौल्यवान आहे हे मी जाणते, त्यामुळे टोकियोतही आम्हाला भरपूर शिकायला मिळालं,” असं त्या सांगतात.

 

कोल्हापूरः कुस्तीपंढरी ते नेमबाजीचं केंद्र

कुस्तीपंढरी म्हणून ओळखलं जाणाऱ्या कोल्हापूरचे नाव आता नेमबाजीतही पुढे येत आहे.

 

आता स्वप्नीलच्या रूपाने कोल्हापुरची ओळख नेमबाजीचं केंद्र म्हणून झालं आहे.

 

स्वप्नील बरोबर राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांच्यासारखे अनेक नेमबाज कोल्हापूरच्या मातीत तयार झालेले आहेत.

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top