पंढरपूर – तारण मालमत्तेचे खोटे मूल्यमापन करून तसा खोटा अहवाल होम फायनान्स कंपनीला देऊन संगनमताने कंपनीची सुमारे साडे बारा लाख रुपयांच्या कर्ज रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी मूल्यमापनकर्ता बिपीन इरण्णा स्वामी यांचा पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याची हकीकत अशी की, आंबे,शिरगांव – पंढरपूर येथील कर्जदारांना खोट्या मालमत्तेचे मूल्यमापन करून तसा खोटा अहवाल आरोपी बिपीन स्वामी यांनी अन्य नऊ आरोपींबरोबर संगनमत करून कर्जदारांसाठी दिल्यामुळे के.आर.एफ.एस. हाऊसिंग फायनान्स कंपनीचे सुमारे साडे बारा लाख रुपयांचे नुकसान व फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद फायनान्स कंपनीचे सोलापूर येथील मुख्य व्यवस्थापक दीपककुमार केन यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिल्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मूल्यमापनकर्ता बिपीन स्वामी यांनी सोलापूर येथील अॅड. अथर्व अंदोरे आणि अॅड. आल्हाद अंदोरे यांच्या मार्फत पंढरपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या मालमत्तेचे स्वामी यांनी योग्य मूल्यमापन केले असल्याचा कागदोपत्री पुरावा अॅड. अथर्व अंदोरे यांनी न्यायालयात सादर करून आरोपी स्वामी हे कर्ज मंजूर करणारे कंपनीचे अधिकारी नाहीत. त्यामुळे आरोपीस खोट्या खटल्यात गुंतवले असल्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद मान्यकरून न्यायाधीशांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे अॅड. अथर्व अंदोरे, अॅड. आल्हाद अंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे अॅड. वांगीकर यांनी काम पाहिले.

