युवा पॅंथरच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा गौरव; शहर विकासावर रंगली चर्चा….!

सोलापूर: शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या ‘युवा पॅंथर’ संघटनेच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल आणि नूतन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सन्मान करण्यात आला. या सत्काराच्या निमित्ताने शहरातील प्रलंबित प्रश्न आणि तरुणांच्या भविष्याबाबत एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र पार पडले. सत्कार समारंभानंतर झालेल्या विशेष बैठकीत शहराच्या विकासावर सविस्तर मंथन झाले. यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रलंबित प्रश्न, शहरातील रस्ते, स्वच्छता मोहिमेतील त्रुटी आणि आरोग्य सुविधा या विषयांवर युवा पॅंथरच्या वतीने महापौरांचे लक्ष वेधण्यात आले. शहराच्या प्रगतीत तरुणांचा सहभाग कसा वाढवता येईल, यावरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या प्रसंगी बोलताना युवा पॅंथरचे आतिश बनसोडे म्हणाले की,

“महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या रूपाने शहराला एक आश्वासक आणि कार्यतत्पर नेतृत्व मिळाले आहे. या नवीन निवडीमुळे शहराच्या विकासाच्या बाबतीत आम्हा सर्व तरुणांच्या मनात एक ‘नवीन आशा’ निर्माण झाली आहे. शहरातील सामान्य नागरिकांचे प्रश्न हे प्रशासन नक्कीच प्राधान्याने सोडवेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.”
महापौर व उपमहापौरांचे आश्वासन
सत्काराला उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी युवा पॅंथरच्या भावनांचा आदर केला. “शहराचा विकास करताना तरुणांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. युवक हीच शहराची शक्ती असून त्यांच्या सहकार्याने आम्ही सोलापूरला विकासाच्या शिखरावर नेऊ,” असे आश्वासन दोन्ही लोकप्रतिनिधींनी यावेळी दिले.
या सत्कार सोहळ्याला अंबादास गायकवाड, रविकांत गायकवाड, विजय गंधम, बालाजी वडलाकोंडा, श्रीशैल मठपती यांच्यासह युवा पॅंथर परिवारातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top