अर्थव्यवस्थापन :यशस्वी जीवनाची दिशा- डाॅ. सुनीलकुमार सरनाईक

अर्थव्यवस्थापन :यशस्वी जीवनाची दिशा
-डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून… जोडोनिया धनं उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेंच करी १ उत्तमचि गती तो एक पावेल | उत्तम भोगिल जीवखणी २ असे म्हटले आहे

कोल्हापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – उत्तम आणि डोळसपणे व्यवहार करुन गाठीला धन जोडावे आणि त्याचा फारसा लोभ मनात न धरता ते मिळविलेले धन अत्यंत विचारपूर्वक खर्च करावे, जो असं करील तो जीवनात यशस्वी होईल अर्थात त्याला उत्तम गती प्राप्त होईल, त्यायोगे त्याला आपल्या आयुष्याचा उत्तम रीतीने उपभोग घेता येईल, असं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वरील अभंगातून सांगतात, खरंतर यांतील मतितार्थ असा की, चोख व प्रामाणिक व्यवहार करून मिळविलेले धन अत्यंत विचारपूर्वक खर्च केले पाहिजे, त्यांतही त्यांच्या विचारपूर्वक हा शब्द अधोरेखित होतो, यांचं कारण आजच्या स्पर्धेच्या जगात आर्थिक व्यवस्थापन हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र झाला आहे, आणि यांचे सुतोवाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी केले आहे.

आज समाजातील बहुसंख्य लोकांना असे वाटते की, आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन म्हणजे आर्थिक व्यवहारांचा हिशेब ठेवणे, त्यांची हिशेबाच्या वहीत नोंद करणे, सर्व माहिती एकत्र करणे आणि ती खातेवही, ताळेबंद इत्यादी विविध आर्थिक विवरणपत्रांच्या स्वरूपात सादर करणे.

खरंतर आर्थिक व्यवहारांचे संकलन,नोंद आणि सादरीकरण म्हणजे आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन नाही, ते तर आपण बरेचजण करतोच. पण कोणत्याही आर्थिक व्यवहारात हुशारीने निर्णय घेणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे… आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करताना आर्थिकदृष्ट्या हुशारीने निर्णय घेणे, त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक कृतीचा आपल्या एकुणच राहणीमानावर कोणता आर्थिक परिणाम होणार आहे, हे लक्षात घेण्याची क्षमता तुमच्याजवळ असायला हवी!.तुमच्या आर्थिक कृतीचा एकुणच नफ्यावर सकारात्मक परिणाम होईल की नकारात्मक? एकदा तुम्हाला हे तुम्हाला कळले की तुम्ही आवर्जुन केवळ अशाच गोष्टी कराल, की ज्या व्यवहारातून तुम्हाला लाभच होईल आणि बहुधा नुकसान करणाऱ्या गोष्टी टाळता येतील.

आजच्या सुधारणेच्या आणि संगणकाच्या युगात आपण सगळेच सतत आर्थिक विषयांत निर्णय घेत असतो. पण तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता आहात, त्या क्षेत्रातील दैनंदिन आर्थिक घडामोडींचे तुम्हाला ज्ञान असायला हवे. जर तुम्ही विपणन क्षेत्रात काम करत असाल आणि एखाद्या संभाव्य ग्राहकाने कमी दराने परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात तुमचे उत्पादन घेण्याचा प्रस्ताव तुमच्यापुढे ठेवला तर तुम्ही काय कराल? तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल, प्रारंभी एवढ्या मोठ्या व्यवहारात मोठी जोखीम पत्करण्याची तुमची तयारी असणार नाही, शिवाय असुरक्षितता व अविश्वास ही वाटेल, असा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करता; परंतु तुम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे की, तुम्ही आर्थिक व्यवहारांशी संबंध नसलेल्या व्यक्ती आहात असे तुम्हाला वाटतं का?, तर प्रथम मनातील नकारात्मक विचारातून बाहेर पडले पाहिजे आणि सर्वांगाने विचार करून हा व्यवहार केला पाहिजे, त्याकरिता धेर्याने निर्णय घेतला पाहिजे,धाडसाला लक्ष्मी माळ घालते हे एक जुने सुभाषित आहे, ते आपण लक्षात घेतले पाहिजे.

तुम्ही जर एखाद्या उत्पादन संस्थेत काम करत असाल आणि मालाचा साठा सांभाळण्याचे काम करत असाल तर तुम्ही उत्पादीत मालाची यादी केली पाहिजे, उत्पादन विभागाने आवश्यक गोष्टींची मागणी केल्यावर तुम्ही त्या वेळेत देता कि नाही यावर तुमची कार्यक्षमता पारखली जाणार आहे; परंतु त्यासाठी तुम्ही आर्थिक परिणामांचा विचार न करता प्रत्येक गोष्टीचा मोठ्या प्रमाणात साठा करणे यशस्वी व्यवहारात शहाणपणाचे ठरणार असते, प्रत्येक वस्तूच्या साठ्याचे आवश्यक ते प्रमाण काय असावे, याचे भान मात्र आपल्याकडे असले पाहिजे,

तुम्ही एखाद्या माॅल मध्ये व्यवस्थापनाचे काम करत असाल तर तुम्हाला असे वाटेल की, तुमच्या जाहिरातविषयक ऑफर्स विक्रीवृध्दी साठी आवश्यक आहेत.पण जोपर्यंत त्यातून तुमच्या संस्थेला लक्षणीय नफा होत नाही; तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या  लाभ मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे काम यशाच्या वाटेवर आहे हे सिद्ध होत नाही. अर्थात, त्यासाठी तुमच्या संस्थेच्या जाहिराती किंवा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या आर्थिक लाभाशी सुसंगत असायला पाहिजेत.

तुम्ही एखाद्या  आर्थिक संस्थेमध्ये प्रमुख प्रशासक असाल आणि तुम्हाला पुढील तिमाहीसाठी लागणारी स्टेशनरी आधीच्या तिमाहीत मिळालेल्या दराच्या १० टक्के कमी दराने मिळत असेल; पण नेहमी दिल्या जाणाऱ्या ९० दिवसांच्या उधारीशिवाय, तर तो पर्याय स्वीकारायचा किंवा नाही हा निर्णय प्रशासकीय नसून आर्थिक असतो.

तुमच्या निर्णयाचा तुमच्या संस्थेच्या नफा वा तोट्यावर  परिणाम करीत असतो, तेव्हा या गोष्टीचा पुर्णपणे अभ्यास केल्याशिवाय किंवा नीट माहीती करून घेतल्याशिवाय असा निर्णय घेणे बेजबाबदारपणाचे ठरेल.

तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीच्या मानवी संसाधनांचे व्यवस्थापन क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही आर्थिक  कंपनीतील रिक्त पदे भरण्यासाठी तयार असलेल्या कर्मचाऱ्यांची क्षमता आणि कर्मचारी संख्या परिणामांचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा!.

तुम्ही स्वतःच्या कंपनीचे मालक असाल किंवा तुम्ही एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीचे नेतृत्व करत असाल किंवा स्टार्टअप सुरू करायचे ठरवत असाल तरी तुमच्या संस्थेच्या नफ्याची जबाबदारी तुमच्यावर असते आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीचा तुमच्या संस्थेच्या नफा-तोट्यावर होणारा परिणाम जाणून घ्यायला शिकलांत तरच तुम्ही ही जबाबदारी पूर्ण करू शकाल.

आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयाचा संस्थेच्या नफ्यावर परिणाम होत असतो, तो समजून घेण्याची क्षमता आपल्या ठायी असायला हवी!.

वरील प्रमाणे छोट्या मोठ्या गोष्टी किंवा निर्णय हे कोणताही व्यवसाय असो अथवा नेतृत्व करण्याचा जाॅब असो, त्या त्या संस्थेच्या किंवा कंपनीच्या नफानिर्मिती करणाऱ्या कृतीच आर्थिक व्यवस्थापन करतात ! कुठलाही व्यवसाय असो, सेवा असो अगर उच्च पदावर काम करणाऱ्या अधिकारी असो अर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, अर्थात अर्थव्यवस्थापन हीच यशस्वी जीवनाची दिशा आहे. यांत संदेह नाही.

-डाॅ.सुनीलकुमार सरनाईक – भ्रमणध्वनी:९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे ग्राहक संरक्षण विषयक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून व्यवसाय व्यवस्थापन विषयातील अभ्यासक आहेत)

Leave a Reply

Back To Top