७० व्या आचार्य श्री शांतिसागर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- श्राविका संस्था नगर सोलापूर येथील बहुउद्देशीय सभागृहामध्ये प.पू. चारित्र्य चक्रवर्ती प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या श्री आचार्य शांतिसागर वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी अकलूज हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे उद्योगपती श्री व सौ.निशा नूतनकुमार कस्तुरचंद गांधी, भारत क्रीडा जिल्हाध्यक्ष अरुण धनपाल उपाध्ये, वक्तृत्व स्पर्धा फंड समितीचे सदस्य देवई शहा, सौ दीप्ती शहा,अनिल जमगे, महावीर शास्त्री, डॉ.सरिता कोठाडिया, सुभाष वनकुद्रे,अतुल शहा, आशिष दोशी, जैन जागरण युवा मंचचे अध्यक्ष मनीष शहा,त्यागी-व्रती अनंतमती भून बेडकीहाळे, माजी अध्यक्ष नमन गांधी,पत्रकार सम्मेद शहा, उमाबाई श्राविका विद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने,सौ अश्विनी पंडित,बाळासाहेब पौळ, सौ प्रांजली काटकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी प.पू.आचार्य श्री शांतिसागरजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.सर्व पाहुण्यांचे सौ पल्लवी खांडवे व सौ सोनाली उंडे यांनी सुमधुर गीताने स्वागत केले.
सुकुमार मोहोळे यांनी प्रास्ताविकेत आचार्य श्रींच्या कठोर तपश्चर्येवर व जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.त्यांच्याप्रमाणे संयम धारण करण्याची सर्वांना प्रेरणा दिली.
वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे प्राकृत विषयाचे प्राध्यापक डॉ महावीर शास्त्री यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी धर्मानुरागी मिहीर गांधी यांनी या वक्तृत्व स्पर्धेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे व येथील नीटनेटक्या नियोजनाचे प्रशंसा केली. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व बक्षिसां साठी मोठी देणगी रक्कम पुढील वर्षीही देऊ असे आश्वासन दिले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी वाचन अनुप कस्तुरे यांनी केले. या ७० व्या वकृत्व स्पर्धेत शहरातील ५० हून अधिक शाळा व महाविद्यालयातील ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता.
११ गटांमध्ये संपन्न होणारे या स्पर्धेमधील प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रमशः 1001, 701 व 501 रुपयांचे रोख बक्षीस,गौरव प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या पडद्यामागील सर्व सूत्रधारांचाही समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा फंड समितीच्या सर्व सदस्यांचे, श्राविका शिक्षण संकुलातील सर्व विभागातील वरिष्ठांचे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.फलक लेखन प्रवीण कंदले यांनी तर स्वागताची रांगोळी सौ.केतकी सोनटक्के यांनी साकारली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकुमार वारे यांनी केले.आभार प्रदर्शन राखी देशमाने यांनी केले.
