पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचं रूंदीकरण करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी
पुणे,दि.२९/०७/२०२५- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६० (नाशिक फाटा ते खेड),राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी (तळेगाव–चाकण– शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचं तातडीनं रुंदीकरण करावं,अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.६० (नाशिक फाटा ते खेड),राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही महामार्गांवर शिक्षण संस्था,औद्योगिक पट्टा, वसाहती,रुग्णालये,पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसंच व्यापारी हब आहेत.यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६० (नाशिक फाटा ते खेड),राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रस्तावास मान्यता देऊन आवश्यक निधी आणि प्रशासकीय मंजुरी तातडीनं मिळवून देण्याची विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे जेणेकरून पुणे औद्योगिक परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत होईल.
