पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत महापालिकेने तातडीने पावले उचलावीत- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे शहरातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत कचरा वेचक महिलेचा दुर्दैवी मृत्यू-डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल
पुणे / डॉ अंकिता शहा,दि.१४ मे २०२५ : पुण्यातील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत ११ मे २०२५ रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना सखोल चौकशी व तातडीच्या उपाययोजनां ची मागणी केली आहे.या अपघातात कचरा वेचण्याचे काम करत असलेल्या श्रीमती सुरेखा सुभाष काळे यांचा पोकलेन यंत्राच्या लोखंडी बकेटच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद असून कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत सुरक्षेचा अभाव असल्याचे यातून अधोरेखित होते,असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी महापालिकेकडून सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः या प्रक्रियेत घनकचरा व्यवस्थापन नियम व सुरक्षा निर्देश यांची अंमलबजावणी झाली होती की नाही याचा तपास करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.त्याचबरोबर महानगर पालिकेच्या कंत्राटदारांमार्फत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री बाबत सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याचा आढावा घेण्याचेही त्यांनी सुचवले आहे.
यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी कचरावेचक कामगारांसाठी आवश्यक सुरक्षा साधने जसे की हेल्मेट व अन्य सुरक्षा उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी,अशी स्पष्ट भूमिका डॉ.गोऱ्हे यांनी मांडली आहे.
पुणे शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत महापालिकेने संवेदनशीलतेने आणि तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
