दिव्यांगांना ओळखपत्र (UDID) देणारी प्रणालीच डाऊन, सेवा तत्काळ सुरू करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचा केंद्राकडे पाठपुरावा
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०७/२०२४ : सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांश दिव्यांगाकडे वैश्विक ओळखपत्र (UDID) नाही. वैश्विक ओळखपत्र प्रणालीवर गेल्या 2 ते 3 महिन्यापासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी शहर आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र अभावी योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. या प्रकरणाची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी दिव्यांगांकरीता महत्त्वाची अशी वैश्विक ओळखपत्र (UDID) प्रणाली तात्काळ सुरु करण्यासंदर्भात राज्याचे दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांच्याशी संवाद साधून केंद्रीय सचिवांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांनाही पत्र लिहून दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
दिव्यांगांकरीता सर्व सरकारी योजनांचा लाभ देता यावा. त्यांची महिती एकत्र राहावी यासाठी केंद्र सरकारकडून वैश्विक ओळखपत्र (UDID) ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र मागील दोन अडीच महिन्यापासून ऑनलाईन सुविधा असलेली ही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे निष्क्रिय झाली आहे. त्यामुळे दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरीत होऊ शकत नाही, परिणामी दिव्यांग व्यक्तींना शंभर ते दीडशे किलोमीटर लांब येऊन देखील वैद्यकीय प्रमाणपत्र न मिळता निराशेने परत घरी जावे लागत आहे.
सरकारी योजनांपासून वंचित
काही सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्था या दिव्यांगांसाठी विशिष्ट योजनेचा लाभ मिळण्याकरीता विशिष्ट तारखेला अर्ज करण्याची मुदत देतात. परंतू दिव्यांगांना वैद्यकीय प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्या तारखेस अर्ज न केल्यामुळे बहुतांश दिव्यांग व्यक्ती दिव्यांग योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत.
पुन्हा अर्ज करावा लागणार
ज्या दिव्यांगाने सन 2021-22 या वर्षामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र प्रणालीवर ऑनलाईन अर्ज केला आहे. त्या व्यक्तीची नावे सर्व्हरवर दाखवले जात नसल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी पून्हा ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तीवर मोठा अन्याय होत आहे.
याशिवाय UIDI ही प्रणाली अद्यावत कऱण्यात आली आहे. मात्र या नवीन बसविलेल्या प्रणालीवर हॉस्पिटलचे नाव सिलेक्ट केले असता दिव्यांग व्यक्तीचा अर्ज केवळ त्याच रुग्णालयास दिसत असल्याने दिव्यांगांची हेळसांड होत आहे.
या सर्व समस्या दूर व्हाव्यात तसेच दिव्यांगांचे लॉगिन करताना त्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळावा. दिव्यांग व्यक्ती त्या रुग्णालयामध्ये जाईल तेथून त्यांना दिव्यांग प्रमाणत्र दिले जावे यासह इतर तांत्रिक बाबी दुरु होण्याकरीता व दिव्यांगांकरीता वैश्विक ओळखपत्र (UDID) प्रणाली तात्काळ सुरु होण्याकरीता खासदार प्रणिती शिंदे यांनी दिव्यांग आयुक्त, केंद्र शासनाचे सचिव व संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु केला आहे.
अधिवेशनात मुद्दा उचलणार
दिव्यांग नागरिकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात या प्रणाली मधील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक व न्याय विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी दिव्यांगांना होणाऱ्या या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी आणि दिव्यांगांची हेळसांड सांडणे थांबवण्यासाठी हा मुद्दा येत्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬