संसदेत हिंदु राष्ट्राची मागणी करतील असे हिंदुत्वनिष्ठ ५० खासदार निवडून आणा -आमदार टी.राजासिंह,
गोवा / ज्ञानप्रवाह न्यूज – आज अनेक लोकप्रतिनिधी निवडून येण्यापूर्वी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे दाखवतात; मात्र सत्तेची खुर्ची प्राप्त झाल्यावर ते धर्मनिरपेक्ष होतात. असे लोकप्रतिनिधी हिंदु राष्ट्रासाठी वा हिंदुत्वासाठी काहीही करणार नाहीत. धर्मनिरपेक्ष नेते हिंदू राष्ट्राच्या मागणीला विरोधच करतील. त्यामुळे किमान ५० हिंदुत्वनिष्ठ खासदार निवडून आणणे आवश्यक आहे,जे संसदेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करतील, असे आवाहन तेलंगणा राज्यातील येथील गोशामहलचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह यांनी गोवा येथील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदु राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग आवश्यक या विषयावर बोलताना केले.
आमदार टी.राजासिंह पुढे म्हणाले की, तेलंगणातील अनेक जिल्ह्यांत अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र आहे मात्र श्रीरामनवमीच्या वेळी लाखो हिंदू भगवे ध्वज घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांनाही आमचा विचार करावा लागतो.भारत स्वतंत्र झाल्या पासून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. प्रशासनातील मोठे अधिकारी, नेते हिंदुत्वाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ यांना त्रास दिला जातो. याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ युवकांना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदांवर पोहोचण्यास साहाय्य करा जेणेकरून ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान देऊ शकतील. हिंदु राष्ट्राचे वा धर्मकार्य करायचे असेल, तर घाबरून चालणार नाही.संतांनी सांगितले आहे की साधनेने हे वातावरण बदलता येईल.त्यामुळे अखंड हिंदु राष्ट्रासाठी साधना करणे आवश्यक आहे.
दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेले तसेच खटला लढवणारे अधिवक्ता यांचा सत्कार
दाभोलकर हत्याप्रकरणात निर्दोष सुटका झालेले सनातनचे साधक विक्रम भावे, न्यायालयीन खटला विनामूल्य लढवणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर, अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अधिवक्ता सौ. मृणाल व्यवहारे आणि अधिवक्ता सौ. स्मिता देसाई यांचा भाजपचे आमदार टी.राजासिंह यांच्या हस्ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि देवतांची सात्त्विक प्रतिमा प्रदान सर्वांचा सत्कार केला गेला.
या खटल्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष झा, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर,अधिवक्ता सुवर्णा वत्स- आव्हाड, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर या सर्वांचे वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये अभिनंदन करण्यात आले.