आमदार आवताडे यांच्या मागणीनुसार दूध दराबाबत शनीवारी मंत्रालयात बैठक

आमदार आवताडे यांच्या मागणीनुसार दूध दराबाबत शनीवारी मंत्रालयात बैठक

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२७/०६/२०२४- दोन दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दूध संस्था चालक व उत्पादकांशी विचार विनिमय बैठक घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व या दुध दरवाढीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून तुमच्या सर्व मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असे आश्वासन दिले होते त्यानुसार आमदार आवताडे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांच्या मागण्यांचे पत्र संबंधित मंत्र्यांना दिले असता या दुध दरवाढ प्रश्नी तात्काळ बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्री तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्यानंतर दुग्धविकास मंत्र्यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील तीन महिन्यात तापमानात झालेली प्रचंड वाढ,पडलेला दुष्काळ यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकरी जनावरांचे पालन करीत आहेत मात्र त्यांच्या दुधाला आवश्यक दूध दर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पुढील मागण्या मान्य करण्यात याव्यात. यामध्ये दूध दर कपात व दूध दरवाढ यावर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे,राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान देणे,दुधाच्या दराबाबत दरवर्षी शासनाने दुधाच्या उत्पादन खर्चावर आधारित एमएसपी व एफआरपी ठरवण्याबाबत आयोग तयार करणे, दुधाचे उत्पादन पॅकिंग व मार्केटिंगबाबत स्वतंत्र धोरण ठरवणे, दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळवर कडक धोरण राबवणे, शासकीय दूध योजना पुनर्जीवित करण्याकरता विशेष प्रयत्न करणे, म्हशीच्या दुधाच्या उत्पादनाचा प्रतिलिटर खर्च 60 रुपये तर गाईच्या दुधाच्या उत्पादनाचा खर्च प्रति लिटर 35 रुपये असा आहे म्हणून गाईच्या दुधास ४० रुपये आणि म्हशीच्या दुधात ७० रुपये असा दर जाहीर करणे,जनावरांच्या गोठा निर्मितीसाठी एमआरजीएस मधील ६०:४० चे धोरण बदलून ९५:५ असे करणे, पंढरपुरी म्हशीचे संगोपन करणाऱ्या गवळी समाजास थेट मदत करणे,जनावरांचा विमा शासनाने उतरणे अशा मागण्या आमदार समाधान आवताडे यांनी निवेदनाद्वारे करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top