अनधिकृत पब,बार,अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना निर्देश

शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी

मुंबई,दि.26 : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज,बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना आज दिले.

पुण्यात काही तरुण तरुणी अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तेथील अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये या संदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा- भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत,अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे.हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत.अमली पदार्थ विक्रेत्यां विरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी.शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत,असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागातही दारु आणि अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही हॉटेल्स आणि ढाब्यांवर सहज या गोष्टी उपलब्ध होत आहेत.प्रशासनातील काही घटकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे.काही नेते मंडळींचाही वरदहस्त असल्यानेच या धाबेवाल्यांवर कारवाई न होता या गोष्टी उपलब्ध होत आहेत अशी चर्चा असून या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांकडून बळजबरीने प्रसंगी मारहाण करून काम करुन घेत असल्याचे दिसून येत आहे.एकाच रुममध्ये कोंडून ठेवले जात आहे जेणेकरून ते पळून जाऊ नयेत याबाबतही तपास सुरू करावा अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top