बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासोबत शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासोबत पाल्य आणि पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.
पुण्यात अलिकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, बालगुन्हेगारी आणि ससून रुग्णालयातील व्यवस्थापना बाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
या बैठकीस महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले,पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद,पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,ससूनचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के,उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजीत पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
डॉ.निलमताई गोऱ्हे म्हणाल्या,बाल न्याय कायद्यानुसार गंभीर गुन्ह्याबाबत कारवाई करतांना गुन्हेगारांना प्रौढ समजण्यात यावे यादृष्टीने नियमांचा अभ्यास करून कार्यप्रणाली निश्चित करण्याचा प्रयत्न करावा.जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाऱ्या बाल कल्याण समितीच्या बैठकांमधील कामकाज गांभिर्याने होईल याकडे लक्ष द्यावे.बाल गुन्हेगारी रोखण्यासोबत गंभीर गुन्ह्यात शिक्षा होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यावर भर द्यावा. महानगरपालिकेने शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची मोहिम राबवावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पोलीस विभाग गुन्हे शोधण्यासाठी उपयोग करीत असलेल्या सीसीटीएनएस प्रणाली बाल गुन्हेगारांसाठी लागू करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल.
शहरातील ब्लॅकस्पॉटची माहिती संकलीत करून अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावल्यास वाहतूकीवर चांगल्याप्रकारे नियंत्रण करता येईल.विविध सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतूक नियंत्रणाबाबत आतापासून नियोजन करावे.शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल महानगरपालिकेने सादर करावा.महानगरपालिका आणि पोलीस विभागाने अपघात रोखण्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी.

ससून रुग्णालयाने नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यावर भर द्यावा.आरोग्य सेवेत ससून रुग्णालयाचा लौकीक चांगला असून तो वाढविण्याचा प्रयत्न करावा.आरोग्य क्षेत्रातील चांगल्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची मदत घेवून कामकाजात पारदर्शकता वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.
मद्यसेवनासाठी परवाना देण्यासाठी भरावयाचे शुल्क वाढविण्याबाबत आणि एक दिवसाचा परवाना देतांना मुले अल्पवयीन आहेत कां याची काटेकोर नियमावली करणे शक्य आहे याचा विचार करावा.मद्य विक्री आणि परवान्याचा वापर याचा ताळमेळ घेण्याची व्यवस्था निर्माण करता येईल का याचाही विचार करावा.अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी,असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.
आयुक्त श्री.नारनवरे म्हणाले की,बाल न्याय कायद्यानुसार बालगुन्हेगारांचे पुर्नवसन करण्यावर भर देण्यात आला आहे. बाल न्याय मंडळातील महिला व बालविकास विभागातर्फे नियुक्त प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. वारंवार गुन्हे करणारे आणि गंभीर गुन्ह्यातील बालगुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी नव्या बाल कायद्याबाबत राज्यासाठीची नियमावली लकवरच करण्यात येत आहे. त्यात प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांवरही भर देण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजातही सुधारणा करण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त श्री.भोसले म्हणाले,अनधिकृत हॉटेल आणि रुफ टॉप हॉटेलवर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे.शहरातील पदपथावरील आणि रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे.नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक सुरक्षेच्यादृष्टीने रस्त्यांच्या रचनेत सुधारणा करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत मागील 15 दिवसात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरातील सुमारे 50 ब्लॅकस्पॉटबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. अवजड वाहनांना शहराच्या मध्यभागात वाहतूकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. 16 ते 18 वर्षातील बालगुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त श्री.रामानंद म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात रात्री ‘ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह’ला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमांविषयी समुपदेशन करण्यात येत आहे.
डॉ.म्हस्के म्हणाले, ससून रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी आदर्श प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. दररोज कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. चांगली रुग्णसेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त श्री.खोराटे यांनी पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
उत्पादन शुल्क विभागाचे श्री.पाटील यांनी उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.