स्वेरीमध्ये आहार क्रांती विषयावर चर्चासत्र संपन्न
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०६/२०२४- गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागामध्ये ग्लोबल इंडीयन सायंटीस्ट अँड टेक्नोक्रॅट्स (GIST) तर्फे आहार क्रांती या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभागप्रमुख डॉ.के.पी.गलानी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या चर्चासत्रात मान्यवरांनी आहार क्रांती चे महत्व विशद केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि भारतातील आर्थिकदृष्ट्या सुलभ, स्थानिक असलेली सकस फळे आणि पाले-भाज्यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी देशभर एक मिशन आहार क्रांती हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये पौष्टिक आहाराच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोषण आहाराबाबत जागृतीच्या क्षेत्रातील हा एक महत्वाचा टप्पा आहे. जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमाचे समन्वयक व संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने यांनी आहार क्रांती विषयक माहिती दिली.
प्रमुख पाहुणे डॉ.एस.एस.वांगीकर यांनी आहार क्रांतीचे महत्व स्पष्ट केले.
कार्यक्रमात संवादात्मक सत्रे, कार्यशाळा आणि प्रदर्शने होती ज्यामुळे उपस्थितांना पोषण आणि निरोगीपणाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी आणि व्यावहारिक ज्ञान मिळाले.
विभागप्रमुख डॉ.गलानी मार्गदर्शन करताना म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी संतुलित me आहार गरजेचा असून आरोग्याच्या वाढीसाठी नियमित ताज्या पालेभाज्या आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे.
प्रमुख पाहुणे इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ.एस.एस. वांगीकर यांनी आपल्या भाषणातून निरोगी राहणे हे आपले कर्तव्य आहे हा संदेश देवून आहार क्रांती या उपक्रमाने समाजामध्ये पोषण आणि निरोगीपणासाठी जागरूकता आणि उत्साहाची नवीन भावना निर्माण झाली पाहिजे, असे सांगितले.
या चर्चासत्रासाठी एम.बी.ए.विभागातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमाद अहमद यांनी केले. प्रा.के.पी.कोंडुभैरी यांनी आभार मानले.