श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धन कामाच्या पारदर्शकतेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची कार्यकारी अधिकार्यांकडे मागणी
संवर्धन कामासाठी आलेला निधी,खर्च झालेला निधी याचा फलक लावण्याची मागणी
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/२०२४-15 मार्च 2024 पासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम चालू आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते यामध्ये सुशोभिकरणा दरम्यान मंदिरात एक तळघर सापडले व त्यामध्ये मूर्ती, पादुका, नाणी इत्यादी सापडले याबाबत प्रथमत: आपले अभिनंदन. पण
मंदिर संवर्धनाचे काम करत असताना जुन्या मंदिरात आणि नवीन संवर्धन केल्यानंतरच्या मंदिरात काय काय बदल/फरक केले याबाबत माहिती मंदिर समिती समाजमाध्यमांद्वारे देत आहेच त्यामध्ये मंदिरात आणखी काही तळघरे, खोल्या सापडल्या काय ? असल्यास त्यामध्ये काय सापडले याबाबत देखील सविस्तर माहिती जनतेला दिल्यास अजुन पारदर्शकता येईल असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांना दिलेले आहे.सदरचे निवेदन देताना सुरज राठी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, मंदिर संवर्धनासाठीची सर्व माहिती नागरिकांच्या, भाविकांच्या माहितीस्तव श्री नामदेव पायरी, पश्चिमद्वार येथे माहितीसाठी लावण्यात यावी. यामध्ये मंदिराचा आराखडा, केलेल्या कामांची माहिती,त्यासाठी शासनाकडून मिळालेला निधी,भविष्यात लागणारा निधी याबाबतची सविस्तर माहितीचे फलक लावण्यात यावे जेणेकरून नागरिकांना व भाविकांना याची माहिती होईल अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
मंदिर समितीकडून सुशोभिकरणाचे लाईव्ह प्रक्षेपण करावे- श्रीकांत शिंदे
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संवर्धनासाठी राज्य शासना कडून कोट्यावधी रूपयांचा निधी आलेला आहे या निधीतून चांगले काम होत आहे यातून जुना पुरातन इतिहास समोर येत आहे त्यामुळे नागरिक व भाविकांच्या मनात कोणतीही शंका येवू नये यासाठी मंदिराच्या आत कुठेही खोदकाम करत असताना मंदिर परिसरात थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.