बार्शी:- बार्शी विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश प्रेमचंद नवगिरे यांनी आपल्या पदाचा तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, त्यांनी जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण युवक काँग्रेस यांच्याकडे अधिकृतपणे राजीनामा सादर केला आहे. हा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
राजीनाम्यात राकेश नवगिरे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, मागील काही दिवसांत महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजावर अन्याय व अपमानास्पद वक्तव्यांची मालिका सुरू असून, काही घटनांमध्ये धार्मिक स्थळांबाबतही अपमानकारक भाष्य झाले आहे. अशा संवेदनशील मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही किंवा विधानसभेतील चर्चांमध्ये विरोधी पक्षाकडून अल्पसंख्याकांचा आवाज उठवला जात नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, जर काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक समाजाची भूमिका विधानसभेत मांडू शकत नसेल, तर अशा पक्षात कार्यरत राहण्याला काहीच अर्थ उरत नाही. समाजाच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही त्यांनी चिंता व्यक्त केली असून, “जर आमच्यावर अन्याय होत असेल आणि काँग्रेस त्यावर आवाज उठवत नसेल, तर आम्हाला संरक्षण कोण देणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
नवगिरे यांनी राजीनाम्यात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रातील संविधानिक पदांवर बसलेले काही मान्यवर वारंवार समाजात जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत असून, अशा प्रकारांवर काँग्रेस पक्षाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, की अशा वक्तव्यांवर कारवाईसाठी ठोस पावले उचललेली नाहीत. ही पक्षाची निष्क्रियता अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राजीनाम्याच्या शेवटी त्यांनी अत्यंत भावनिक शब्दांत लिहिले आहे की, “अल्पसंख्याक समाजाने कायम काँग्रेसला पाठिंबा दिला, पण आज जर आमच्याविरुद्ध कुणी बोलले, तर काँग्रेस मात्र शांत का?” या परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहण्याचे कारण उरत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे.
हा राजीनामा त्यांनी सोलापूर ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांना सादर केला असून, प्रत माहितीस्तव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. कुणाल राऊत यांना पाठवण्यात आली आहे.
“मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातूनही बाहेर पडत आहे. ही भूमिका घेताना मन खूप व्यथित आहे, पण सत्याकडे डोळे झाकून राहता येत नाही…”
— राकेश प्रेमचंद नवगिरे, उपाध्यक्ष (राजीनामापूर्वी), युवक काँग्रेस बार्शी विधानसभा.
ह्या राजीनाम्यानंतर बार्शीतील काँग्रेसच्या स्थानिक कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात युवक काँग्रेसच्या अंतर्गत संघटनेत काय बदल होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.