मंदिर समितीच्या सदस्या ॲड.माधवी निगडे यांच्या हस्ते तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सुलभ शौचालय संकुलाचे उद्घाटन
सुलभ शौचालय संकुलसाठी मंदिर समिती मार्फत भाडे तत्वावर जागा व शासन निधीतून बांधकाम

पंढरपूर दि.08:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर रेल्वे स्टेशनची जागा भाडे तत्वावर घेऊन तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सुलभ शौचालय संकुल बांधकाम करण्यात आले आहे. या संकुलाचे चैत्री एकादशीच्या मुर्हूर्तावर मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, सुलभ प्रोजेक्ट मॅनेजर मुकेश झा, के डी ओझा व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

सदर संकुलासाठी रेल्वे स्टेशन, पंढरपूर यांची जागा मंदिर समितीने 35 वर्षे मुदतीवर भाडे तत्वावर घेतली आहे व त्यावर शासन निधीतून तिर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुलभ शौचालय इमारत बांधकाम करण्यात आली आहे. यामध्ये 2 इमारत असून, एक इमारत रेल्वेच्या विश्रामगृहाशेजारी आहे व त्यामध्ये महिलांसाठी बाथरूमसह 20 शौचालये, पुरूषांसाठी बाथरूमसह 20 शौचालये असे एकूण 40 तसेच इतर 48 शौचालये व अपंगासाठी 1 शौचालय आहे. याशिवाय, रेल्वे टिकीट काऊंटर शेजारील इमारतीमध्ये महिला व पुरूषांसाठी प्रत्येकी 30 प्रमाणे एकूण 60 शौचालये व 9 बाथरूमची सुविधा उपलब्ध आहे. या सुलभ शौचालय संकुलाची देखभाल दुरूस्ती सुलभ इंटरनॅशनल लि, मुंबई यांचेकडे राहणार आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूरला येणा-या प्रत्येक वारकरी भाविकां पर्यंत सेवा पोहोचविण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहणार आहे.पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा असून,वारी स्वच्छ, निर्मल व सुंदर व्हावी तसेच इतर सोयी सुविधांबरोबरच स्वच्छतेला अधिक महत्व आहे. त्यासाठी मंदिर समिती कार्य करीत आहे.येणा-या सर्व वारकरी भाविकांनी स्वच्छतागृहाचा वापर करावा असे आवाहन यावेळी ॲड.माधवी निगडे यांनी केले.