शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ. नीलम गोऱ्हे

लातूर जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात विविध प्रश्नांवर मंथन

शून्य आत्महत्या जिल्हा घडवण्यासाठी लातूरला पुढाकार घ्यावा लागेल— डॉ.नीलम गोऱ्हे

पाण्यात सांडपाणी मिसळते का, याची चौकशी करा; महापालिकेला स्पष्ट निर्देश

लातूर, ४ एप्रिल २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्यात प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी यांच्या संयोजनातून करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला प्रश्न, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, शेतकरी आत्महत्या यासह विविध सामाजिक मुद्द्यांवर डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

बैठकीच्या प्रारंभी त्यांनी लातूर जिल्ह्यातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी, रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या तांत्रिक अडचणींवर लक्ष केंद्रित केले. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नगरविकास विभाग व महापालिका आयुक्त यांच्यासमवेत प्रयत्न सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाणीपुरवठा व सांडपाणी प्रश्नावर तातडीने कारवाईचे निर्देश

लातूर शहरातील काही भागांमध्ये येणाऱ्या पिवळसर पाण्याच्या समस्येवर चिंता व्यक्त करत उपसभापतींनी पाण्यात सांडपाणी मिसळते का, याची चौकशी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, “पाणी शुद्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिलं गेलं आहे; परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.”

वाहतूक कोंडीवर उपाययोजना अनिवार्य

लातूर शहरातील वाहतूक कोंडी, विशेषतः एसटी स्टँडजवळील आणि काही महत्त्वाच्या चौकांतील समस्येकडेही डॉ. गोऱ्हे यांनी लक्ष वेधले. या समस्येच्या निराकरणासाठी वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शून्य आत्महत्या जिल्ह्यासाठी प्रयत्नशील

शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.लातूर जिल्हा ‘शून्य आत्महत्या’चा आदर्श निर्माण करू शकतो, यासाठी प्रयत्नांची गरज आहे, असे सांगून त्यांनी प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नेतृत्व यांना या दिशेने कार्यवाहीसाठी प्रेरित केले.

बैठकीदरम्यान पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रत्येक प्रभागात महिला व पुरुष शाखा स्थापन करणे आणि उपविभाग प्रमुखांनी दर पंधरा दिवसांनी बैठक घेणे अनिवार्य असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

याच बैठकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते २३ महिलांचा पक्षप्रवेशही संपन्न झाला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या महिलांचे स्वागत करत, त्यांनी महिला सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.

प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

ही बैठक शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना वरिष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर, गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख वर्षा मोरे, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, प्रदेशाध्यक्ष (ओबीसी सेल) बाळासाहेब किसवे, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, सचिन दाणे, गोपाळ माने, महिला जिल्हाप्रमुख कल्पना बावगे, उर्मिला भगत , अर्चना बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी इतर मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top