छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परमपूज्य रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने धर्मासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे,दि.२९/०३/२०२५ – छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथील त्यांच्या समाधीस्थळाचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी पूजन केले.यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून शिवशंभूप्रेमींशी संवाद साधला.

यावेळी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां’च्या नावे देण्यात येणारा पुरस्कार परमपूज्य रामगिरी महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच इतर पुरस्कारांचे देखील यावेळी वितरण करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत आहे. आज त्याच कर्तव्यभावनेतून आपण इथे आलो आहोत असे सांगत शंभूराजांच्या पराक्रमाचे वर्णन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली अर्पण केली.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परमपूज्य रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने धर्मासाठी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो तेव्हाच या राज्यात महायुती सरकार असेपर्यंत साधू संतांच्या केसाला धक्का लागणार नाही असे मी सांगितले होते. देशात गोमातेला ‘राज्य माते’चा दर्जा देणारे हे पहिले राज्य असल्याचे यासमयी नमूद केले. तसेच यापुढे गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देखील दूर करून त्यांना संरक्षण दिले जाईल असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शिवकालीन गडकोट किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले जातील असे याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधोरेखित केले.
यावेळी माणिकराव महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, आमदार माऊली कटके, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले, सोमनाथ भंडारे, आनंद पिंपळकर, संदीप मोहिते पाटील, वढू ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले तमाम शिवशंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.