पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम सुरू
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०३/२०२५ – नगरपरिषदे च्यावतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले असून सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे व पाणी वाहते नसल्याने शेवाळ्याचे ही प्रमाण वाढले आहे तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना ही आंघोळ करताना अडचणी निर्माण होत आहे.

पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने भाविकांनी नदीमध्ये टाकलेले पूजेचे सामान,जुने कपडे हे उघड्यावर पडले आहेत याची दखल घेत प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी ५० सफाई कर्मचाऱ्यांच्या मार्फत नदीपात्रातील नदीकाठाचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.येत्या चार ते पाच दिवसात सर्व शेवाळे, जुनी कापड काढण्याचे काम पूर्ण होईल.

याकामी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक नानासाहेब गोरे व सर्व सफाई कर्मचारी काम करीत आहेत. चैत्री यात्रेच्या निमित्ताने नदीपात्रात लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे.सदरचे पाणी सोडल्यास नदीतील असणारे सध्याचे घाण पाणी निघून जाईल व वारकऱ्यांनाही चैत्री यात्रा कालावधीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये पवित्र स्नान करता येईल.

नदीपात्रातील,नदीकाठाचा कचरा व नदीतील शेवाळे,जुने कपडे ज्यामुळे भाविकांच्या पायात अडकून जिवाला धोका संभवतो तसेच पाण्याला दुर्गंधी सुटते ते टाळण्यासाठी सातत्याने सामाजिक संस्थांच्या आणि मंदिर समितीच्या मदतीने नदीपात्राची साफसफाई करणे गरजेचे आहे.जुने कपडे टाकण्यासाठी वेगळी व्यवस्था करणे आवश्यक आहे.