ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – जयकुमार रावल
राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून अभिनंदन
मुंबई,दि.20 : सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात महान कलाकृती साकारल्या आहेत. आज शंभर वर्षाचे असून देखील त्यांच्या डोळ्यापुढे केवळ जगातील उत्कृष्ट कलाकृती साकारण्याचे चिरतरुण ध्येय आहे. त्यांनी अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. त्याकरिता त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असून आज त्याच अजरामर आणि अप्रतिम शिल्पकृती साकारणाऱ्या प्रतिभा संपन्न कला कर्तृत्वाचा आणि समर्पणाचा सन्मान होत आहे, अशा शब्दात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी ज्येष्ट शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करीत अभिनंदन केले.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
मंत्री रावल पुढे म्हणाले की, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आमच्या धुळे जिल्ह्याचे सुपुत्र असून गोंदूर हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्प उभारली आहेत.त्यामध्ये जगप्रसिध्द सरदार वल्लभ भाई पटेल (स्टॅच्यू ऑफ युनिटी) यांचा सर्वात उंच पुतळा उभारणीचे काम त्यांनी केले आहे. याचबरोबर देशभरातच नाही तर जगभरात त्यांनी अनेक महापुरुषांची शिल्पे साकारली आहेत. त्यांनी भगवान बुद्ध, भगवान महावीर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासह इतर महान विभूतींच्या मूर्ती अत्यंत चित्तवेधक साकारल्या आहे. आपल्या प्रतिभा संपन्न कला कर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्राबरोबर धुळे जिल्ह्याचेही नाव सातासमुद्रापार नेले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे संपूर्ण धुळे जिल्हावासियां च्यावतीने मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे मंत्री जयकुमार रावल म्हणाले.