आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार खपवून घेणार नाही – श्रीकांत शिंदे
आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून गैरप्रकारांवर कडक निर्बंधांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०५/२०२४- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटूंबातील कष्टकरी गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थांना त्यांच्या परिसरातील १ किलोमीटर परिघातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी राज्य शासनाने आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा २००५ पासून राज्यात लागू केला आहे.यामध्ये पालकांच्या उत्पनाची अट जास्तीत जास्त १ लाख रुपये इतकी आहे.मात्र या प्रवेश प्रक्रियेत अनेक ठिकाणी तलाठी,मंडल अधिकारी अथवा स्थानिक प्रशासनास हाताशी धरून अनेक धनदांडगे लोक १ लाखाच्या आतील उत्पनाचे दाखले काढून आरटीई प्रवेश प्रक्रियेचा गैरफायदा उचलत असल्याची बाब मागील काही वर्षात वारंवार निदर्शनास येत आहे.त्यामुळे आरटीई प्रवेश प्रकियेसाठी देण्यात येणाऱ्या उत्पनाची दाखल्यांची पडताळणी महसूलच्या विशेष पथकामार्फत करून गोरगरीब कुटूंबातील पालक आणि पाल्यांवर होणार अन्याय दूर करणे गरजेचे आहे. यासाठी आर टी ई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणून होणारे गैरप्रकारावर कडक निर्बंध करून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच लाभ मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जर गोरगरिबांच्या शिक्षणाच्या अधिकारावर अधिकाऱ्यांशी संगनमत करून जर कोणी गैरप्रकार करत असतील तर ते माझ्यासमोर मांडा त्यांच्यावर नक्कीच मी ही कारवाई करणार पण यावेळी असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असेही त्यांनी आश्वासन दिले.
अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन – श्रीकांत शिंदे
तलाठी,तहसीलदार यांनीसुद्धा दाखले देत असताना नीट लक्षपूर्वक खरे दाखले द्यावेत. चुकीच्या पद्धतीने दाखले देण्यात आले तर पुन्हा फेर चौकशी लावण्यात येईल अन् त्यात दोषी आढळले तर त्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले असल्याचे सांगून सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ मिळविण्याकरता प्रयत्न करावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.