जेष्ठ कलाशिक्षक भारत गदगे सरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार तसेच लोकमान्य विद्यालयाचे ज्येष्ठ सेवानिवृत्त कलाध्यापक भारत गदगे सर यांचा सोलापूर कलाध्यापक संघाच्या वतीने डॉ.वा.का.किर्लोस्कर सभागृह, हि.ने.वाचनालय,सोलापूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये मा.प्राचार्य सुदर्शन देवरकोंडा यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी गोपाळराव डांगे,भंवर राठोड,धर्मेश टंक, गोपीनाथ नवले,सतीश सुभेदार,सोलापूर कलाध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश तडका, सचिव मुकुंद मोरे तसेच सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यातील कलाशिक्षक उपस्थित होते.

भारत गदगे सर हे महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रा तील एक उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांचे वडील व कला महर्षी कै.अर्जुन पेंटर यांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला.कलेचे शिक्षण घेत असताना त्यांनी अत्युच्च गुणवत्ता प्राप्त केली.मोठ्या शहरांमध्ये अनेक संधी उपलब्ध असतानाही वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी पंढरपूर मधील दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण करण्यासाठी, पंढरपूरच्या लोकमान्य विद्यालयामध्ये सेवेची संधी स्विकारली.
आपल्या प्रदीर्घ सेवेच्या कालावधीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना कलेची गोडी लावली व त्यामधून अनेक कलाकारही निर्माण केले. शाळेमध्ये सेवा बजावत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोपासना करत असतानाच त्यांनी निरंतर सामाजिक बांधिलकीची जोपासना केली.आपल्या विविध चित्रप्रदर्शनांद्वारे अनेक सामाजिक संस्थांना मोठे सहकार्य केले. अनेक शासकीय उपक्रमांमध्ये, त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून उत्तम कामगिरी बजावली.त्यांनी निर्माण केलेल्या चित्रकृती तसेच म्युरल्स,फायबर ग्लास कलाकृती आज फक्त महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गजांच्या घरी विराजमान आहेत.ज्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींपासून ते विविध राजकीय, सामाजिक,चित्रपट,साहित्यिक,क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होतो.

कलाक्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून,महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटनांनी अनेक पुरस्कारांद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.
सेवानिवृत्तीनंतरही ते सतत कलाक्षेत्रातील नवोदित कलाशिक्षक तसेच चित्रकारांना निरंतर मार्गदर्शन करत आहेत.तसेच आजही विद्यार्थ्यांच्या कलागुणांची जोपासना होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.त्यांनी महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राला आजवर दिलेल्या योगदानासाठी कृतज्ञता म्हणून,सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरां कडून भारत गदगे सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.