स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’
स्वेरीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचा उपक्रम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५- तरुणाई ही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत विविध डे साजरा करत असल्याचे सांगितले जात आहे.उद्याच्या भारताचे आपण आधारस्तंभ आहोत याचा जणू या तरुणाईला विसर पडलेला असल्याचे आपल्याला जाणवते. अशा मुल्यहिन संस्कृती मधून तरुणाईला वेळीच बाहेर काढणे गरजेचे आहे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम.बी.ए.चे विभाग प्रमुख डॉ.कमल गलानी यांच्या नेतृत्वाखाली नुकताच रोटी डे साजरा करण्यात आला.
स्वेरीच्या एम.बी.ए.चा प्रत्येक विद्यार्थी योगदानासाठी पुढे सरसावला. या अनुषंगाने स्वतःच्या घरून कोणी चपात्या तर कोणी भाकरी आणल्या. संपूर्ण दिवसभर जरी वाटप केले तरी खराब होणार नाहीत अशा चमचमीत भाज्या आणल्या. पॅकेटमध्ये चपात्या,भाकरी व भाजी अशा स्वरूपात जवळपास ७०० पॅकेट तयार करून मोठ्या बॉक्समध्ये घेवून ११० विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी वलटे यांच्यासह एम.बी.ए.विभागाने प्रथम गोपाळपूरातील श्री संत तनपुरे महाराज संचलित मातोश्री वृद्धाश्रम गाठले. येथे वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे यांनी सर्वांचे स्वागत केले.या वृद्धाश्रमात अन्नदान करून हा आगळावेगळा ‘रोटी डे’ साजरा केला.विद्यार्थ्यांनी आणलेले अन्न,फळे त्यांनी घेऊन विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले.अन्नदान करताना वृद्धांसमवेत साधलेल्या संवादामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींना अक्षरश: रडू कोसळले.

विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरातील दत्त घाटानजीकच्या पायऱ्यांवर असलेल्या सर्व भिक्षुकांना विद्यार्थ्यांनी अन्नाची पाकिटे दिली तसेच कोर्टी रोड येथील पालवी या बालकाश्रमात चटई वाटप केले. सायंकाळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेऊन कॉलेजच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला.
मनापासून व आनंदाने केलेल्या रोटी डे या उपक्रमाने सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम सकारात्मकता शिकवून जाईल,हे मात्र नक्की!