मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार

मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार

मंगळवेढा पोलीस दलाची या पुरस्काराने मान उंचावली….

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना महाराष्ट्र शासानाचा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार मिळाला असून याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हा पुरस्कार शिरोळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना केलेल्या विविध कामाबद्दल त्यांना मिळाला आहे.

मंगळवेढ्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे येथे येण्यापुर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील पोलीस स्टेशनला सन 2021 ते 2023 या कालावधीत कार्यरत होते.या दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या सुचनांच्या अनुषंगाने पो.नि.बोरीगिड्डे यांनी त्यांच्या कारकिर्दीत दाखल गुन्हे उघडकीस आणून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. त्याचबरोबर आरोपींना शिक्षाही लागल्या होत्या.हे करत असताना त्यांनी पोलीस प्रशासन लोकाभिमुख करुन कामकाज पारदर्शक केले होते.पोलीस स्टेशन व परिसर याकडे वेळोवेळी लक्ष घालून स्वच्छता राखण्यात त्यांनी अधिक भर दिला होता. या कार्याची राज्याच्या पोलीस महासंचालकांने दखल घेवून त्यांना नुकताच ठाणे येथे महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी राज्यातील अन्य चार पोलीस अधिकार्‍यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यमान कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेवून अहवाल पोलीस महासंचालकाला पाठविला होता.ते मुळचे सांगली जिल्ह्यातील असून 2005 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत ते यशस्वी होवून सेवेत दाखल झाले. आत्तापर्यंत त्यांना शंभरच्या पुढे रिवॉर्ड मिळाल्याचे सांगण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,मंगळवेढ्याचे डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड व सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पोलीस निरीक्षक बोरीगिड्डे हे मागील महिन्यात मंगळवेढ्याला बदलून आले असून या पुरस्कारामुळे मंगळवेढ्याच्या पोलीस दलाची मान उंचावली आहे.

मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रदान करण्यात आला.यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक,गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला,मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र डॉ.संजय दराडे,ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top