माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता…
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रा जी महाशिवरात्रीच्या कालावधीत भरते तिची सांगता पाच दिवसाच्या कार्यक्रमानंतर श्री च्या पालखीच्या मिरवणूकीने हर.. हर.. महादेवच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली.

ही यात्रा महाशिवरात्रीला दरवर्षी पाच दिवस भरते.गेली पाच दिवस हा परिसर यात्रेमुळे भाविकानी फुलून गेला होता. आंध्र,कर्नाटक, महाराष्ट्र,गोवा आदी भागातील भाविक दर्शनासाठी आले होते.मंगळवेढा आगाराने भाविकांच्या सोयीसाठी एस.टी.बसची व्यवस्था केली होती.काही भाविक बैलगाडी, चारचाकी वाहने,दोन चाकी वाहने आदींच्या माध्यमातून दर्शनासाठी येथे आले होते. यात्रा कालावधीत मोठया प्रमाणात नारळ व मेवा मिठाई यांची विक्री झाल्याचे व्यवसायिकां कडून सांगण्यात आले. दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक नारळ व जाताना प्रसाद म्हणून मेवा मिठाई खरेदी करीत असल्यामुळे दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. रविवारी सायंकाळी 5 वाजता मंदिराच्या पायर्यावरती दोन्ही बाजूला परिसरातील महिला भाविक आरत्या घेवून बसल्याने सुंदर दृष्य दिसत होते. यावेळी नवस बोललेल्या भाविकांनी देवाला पेढे वाटले. काहींनी नारळाचे तोरणही बांधले.भीमा नदी पात्रात पाणी असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी नदीकडील घाटावर असलेला दरवाजा कुलूपबंद ठेवण्यात आला होता. सायंकाळी 7 वाजता श्री च्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान माचणूर गावाकडे झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत हर.. हर.. महादेवच्या घोषणा दिल्याने मंदिर परिसर दुमदुुमून गेला होता.