शहराजवळील बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरा जवळील बायपास रोड वरील दामाजी कारखान्याकडे जाणार्या चौकात बेकायदेशीर दारु अड्ड्यावर दारु पिण्यास वाहन चालक रस्त्याला वाहने उभा करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतूकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी या धंद्यावर व वाहने उभे करणार्या चालकांवर कारवाई करुन वाहतूकीस मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकांमधून पुढे येत आहे.

मंगळवेढा शहरालगत पंढरपूरहून येणारी व कर्नाटक उमदीकडे तसेच सोलापूरकडे जाणारी वाहने बायपास रोडने पुढे जातात. दामाजी कारखान्याकडे जाणार्या बायपास येथे चौक असून या चौकालगतच अवैध दारु विक्री करणारा अड्डा असल्याने ऊसाची वाहने व ट्रकवाले येता जाता रस्त्याला वाहने उभा करुन दारु पिण्यासाठी जातात त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने अन्य वाहन चालक व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहर बीटचे पोलीस येथून येतात जातात मात्र त्यांना येथील बेकायदा दारु अड्डा व रस्त्यावर उभी राहिलेली वाहने दिसत नसल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.
सकाळी व सायंकाळी येथूनच जेष्ठ नागरिक बायपास रोडला फिरावयास जातात. येथेच झींगलेल्या अवस्थेत दारुडे फिरत असल्याने त्या महिलांना जीव मुठीत घेवून दहशतीखाली जावे लागत आहे.यापुर्वीही या जेष्ठ महिलांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार करुनही त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे सांगितले.त्यामुळे सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कामी लक्ष घालून येथील बेकायदा दारु अड्डा हटवून रस्त्यात उभारणार्या वाहनांवर कारवाई करुन येथील मार्ग सुकर करावा आणि होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे.
शहरालगत बायपास रोडवर वाहनचालक वाहने उभा करुन दारु पिण्यास गेल्याने झालेली वाहतूकीची कोंडी छायाचित्रात दिसत आहे.