मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने कपाटातील 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने पळविले
अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…..
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले 2 लाख 6 हजार 510 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी रंजना बापूसाहेब आसबे वय 57,रा.मुंबई खारघर या दि.19 जानेवारी रोजी मुंबईहून आल्या होत्या. त्यावेळी खर्चासाठी काही पैसे व सोन्याचे दागिने सोबत आणून काळ्या रंगाच्या पर्समध्ये कपाटात ठेवले होते.दि.4 रोजी सकाळी 8 वाजता किरकोळ सामान घेण्यासाठी फिर्यादीने कपाटातील पर्स घेवून पैसे घेण्यासाठी कपाटाकडे गेले असता कपाट उघडे दिसले. दुपारी 4 वाजता आईच्या घरातील कपाटात काळ्या रंगाची कातडी पर्स ठेवली असल्याने त्यामधील पैसे घेण्यास गेल्यावर सदरची पर्स कपाटात दिसून आली नाही.त्यामुळे सर्व घरात शोध घेतला परंतू पर्स मिळून आली नाही.
फिर्यादीच्या आईस अर्धांगवायू असल्याने तिची देखभाल करत असताना घराचा मुख्य दरवाजा अनावधनाने उघडा राहिला होता. सदर कपाटही उघडे होते त्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करुन पर्समध्ये ठेवलेले 6 हजार 510 रोख रक्कम, 1 लाख 25 हजार रुपये किंमतीचे साडे तीन तोळे वजनाचे गंठण,50 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण,25 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाची कर्णफुले असा एकूण 2 लाख 6 हजार 510 रुपयाचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.