कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्यांचे दिले निवेदन
माढा/ज्ञानप्रवाह न्यूज-कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मुंबईत भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले.

यात केळी या फळासाठी टेंभुर्णी,ता.माढा येथे केळी संशोधन केंद्र उभारणे,सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प पर्जन्यमान असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर होणाऱ्या केळी या फळाच्या उत्पादनात कृषिक्रांती घडवून आणलेली आहे.येथील शेतकऱ्यांनीदेखील केळीमध्ये नव-नवीन वाण तयार करून नांवलौकिक मिळविलेला आहे.परंतु शासना कडून सदर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणेसाठी कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध नाहीत. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी संशोधन केंद्र उभारल्यास लगतच असलेल्या तालुक्यातील केळी उत्पादकांना त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
देशामध्ये यावर्षी २४ हजार कंटेनर इतकी केळीची निर्यात केलेली आहे. त्यामधील निम्मा वाटा हा सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यात करण्याचा असून सरासरी रू.५७ कोटींची केळी निर्यात झाल्याचे दिसनू येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केळी सशोधन केंद्र उभारणे आवश्यक आहे.

द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणेबाबत
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन डिसेंबर २०२४ मध्ये उपस्थित केलेल्या विषयानुसार शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या कर्ज माफी मध्ये सर्वसाधारणपणे २ ते ३ लाखांची मर्यादा केलेली आहे. परंतु द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना शेड मारणे, फौंडेशन उभा करणे इत्यादी कामासाठी जादा कर्ज घ्यावे लागत असल्यामुळे त्यांच्या कर्जमाफीला मर्यादा न ठेवता त्यांचेसाठी कर्जमाफीच्या नियमात बदल व्हावा.कोरोना काळापासून द्राक्ष बागायत शेतकरी हा आर्थिक अडचणीत आला असल्यामुळे या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी.तसेच द्राक्ष बागायत शेतकऱ्यांच्या बेदाणासाठी प्रतिकिलो रू. २५०/- असा हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
याबाबत सकारात्मक चर्चा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत झाली असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले.