मंगळवेढा एमआयडीसीत जागा घेऊन व्यवसाय सुरू न करणाऱ्यांच्या जागा परत घ्या- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा एमआयडीसीत जागा घेऊन व्यवसाय सुरू न करणाऱ्यांच्या जागा परत घ्या– आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ – मंगळवेढा शहरालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये अनेकांनी व्यवसायासाठी जागा घेतल्या आहेत मात्र त्या जागेवर व्यवसाय सुरू न करता शेड मारून फक्त जागा गुंतवून ठेवल्या आहेत अशा लोकांना नोटीसा काढून त्या जागा परत घ्या आणि तात्काळ व्यवसाय करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्या अशा सूचना पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान आवताडे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ते मंगळवेढा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजित जगताप,भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर,सुरेश भाकरे, तानाजी काकडे,प्रकाश गायकवाड, औदुंबर वाडदेकर यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की एकूण 94 हेक्टर जागाही एमआयडीसीसाठी आरक्षित आहे. त्यामधील 40 हेक्टर जागेवर सोलर कंपनी असून उर्वरित जागा व्यवसायासाठी आहे.अनेक व्यावसायिकांनी जागा घेतल्या पण व्यवसाय सुरू केले नाहीत अशांना नोटीस काढून दोन महिन्याची मुदत द्या, जे दोन महिन्यात व्यवसाय सुरू करत नाहीत त्यांच्या जागा परत घ्या व नवीन व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्या लोकांसाठी खुल्या करा. त्याचबरोबर पाण्याची, दिवाबत्ती,विजेची सोय करा. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील एमआयडीसीमध्ये लोकांच्या हाताला काम मिळेल असे नियोजन करून त्वरित व्यवसायिकांना जागा वाटप करण्याच्या सूचना देत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या कामाचाही आढावा घेतला .

यावेळी पंढरपूरच्या एमआयडीसीबाबत अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की जागा हस्तांतर करून घेण्याची प्रक्रिया सुरू असून संयुक्तिकरित्या मोजणी करून लवकरच जागा हस्तांतर करून घेण्यात येईल.यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी लवकरात लवकर जागा हस्तांतरण करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top