मंगळवेढा येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्या सह पंधरा पदे रिक्त
गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्याशिवाय चालतोय शिक्षण विभागाचा कारभार …

मंगळवेढा /मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जानेवारी – मंगळवेढा येथील पंचायत समिती शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकार्यासह विविध अन्य पदे रिक्त असल्याने भविष्यातील देशाचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्या शालेय मुलांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे असून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याकामी तात्काळ लक्ष घालून रिक्त पदे भरावीत अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.
मंगळवेढाचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी दशरथ यरवळकर हे दि.७ जुलै २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले तेव्हापासून आजतागायत तब्बल ९ वर्षे झाली या कार्यालयासाठी गटशिक्षणाधिकारीच मिळाले नसून प्रभारी केेंद्र प्रमुखावरच हा कारभार चालत असल्याने शिक्षणाची ऐशी तैशीच सुरु असल्याच्या पालकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
गटशिक्षणाधिकार्याबरोबरच पोषण आहार अधिक्षक -1,विस्ताराधिकारी -2,केंद्र प्रमुख -8,मुख्याध्यापक -4 अशी एकूण 16 पदे पंचायत समिती शिक्षण विभागात रिक्त आहेत.मोरेवाडी,डोंगरगांव,बंडगरवाडी,भोसे या चार शाळेवर मुख्याध्यापक नसल्याने प्रभारी मुख्याध्यापक असून शालेय अध्यापन करावयाचे की मुख्याध्यापकाचा कार्यभार सांभाळावयाचा असा या शिक्षकांपुढे प्रश्न पडला आहे.दोन्ही पदाचा भार सांभाळताना अध्यापन करावयास वेळ मिळत नसल्यामुळे मुलांच्या भवितव्याचे काय होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आत्तापर्यंत प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून हणमंत कोष्टी, बजरंग पांढरे,पोपट लवटे आदींनी पदभार सांभाळून शिक्षणाचा गाडा हाकला आहे.