केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजोपयोगी ठरावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ,दि.१८/०१/२०२५-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या (केईएम) शताब्दी वर्ष शुभारंभ’ कार्यक्रमात मुंबई येथे सहभागी झाले. यावेळी त्यांनी कर्मचारी भवनाचे ई-भूमिपूजनही केले.

केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे.आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे,ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते.मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. या संस्थेने आपल्या शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण केले असून, हे वर्ष समाज उपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीत डॉ.केम बहादुर, डॉ.सरफरोशी मेहता आणि डॉ.जीवराज मेहता यांच्यासह अनेक तज्ञांचे मोलाचे योगदान लाभले आहे.डॉ.केम बहादुर हे लंडन विद्यापीठातून एमडी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते.मात्र भारतीय असल्याने त्यांना ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी नोकरी नाकारण्यात आली.याच अनुभवामुळे त्यांनी भारतीयांसाठी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला.दुर्दैवाने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम करून हे वैद्यकीय महाविद्यालय उभारले. ज्याचा आज आपण शताब्दी वर्ष शुभारंभ साजरा करत आहोत,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

या संस्थेच्या १०० वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पणवृत्तीने काम करणाऱ्या लोकांचे आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे.राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ₹ ५ लाखा पर्यंतचे मोफत उपचार मिळत आहेत.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे धोरण राज्याने स्वीकारले असून मागील एका वर्षात १० नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालये राज्यात सुरू करण्यात आली आहेत.

केईएम हे कुटुंब असून ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते आणि अशीच काळजी पुढे घेतली जाईल’ असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा,मंत्री प्रताप सरनाईक,खासदार मिलिंद देवरा, आ.अजय चौधरी, आ.कालिदास कोळंबकर, आ.राजहंस सिंह,महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आदींसह मान्यवर उपस्थित होते.