मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे नतमस्तक..

मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जानेवारी २०२५-मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील मावळा प्रतिष्ठान च्यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाल्या.सर्वांचे स्वागत रामभाऊ लांडे यांनी केले.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा व सोलापूर जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात माँसाहेब जिजाऊंचा मोलाचा वाटा होता.हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं, त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली त्याला खतपाणी दिलं, जोपासलं वेळप्रसंगी रणांगणात तलवारही हाती घेण्यात त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी शिवरायांच्या मनावर कर्तव्यनिष्ठा आणि सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करण्याचे संस्कार केले आणि त्यातूनच १८ पगड जातींना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले.आदर्श माता, कुशल राज्यकर्त्या स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, त्यांचाच आदर्श घेऊन आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत अशाच कर्तृत्ववान भगिनींचा सत्कार करण्यात आला याचा अभिमान वाटतो.

या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, रामभाऊ लांडे पाटील,डॉ स्मिताताई पाटील, शिवाजी जाधव,दीपक जाधव,दीपक पाटील, बाळासाहेब लांडे,तात्यासाहेब बाबर, मेजर निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.