श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण
ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड प्रणाली,तात्काळ व्हाट्सअप द्वारे देणगी पावती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.24- ॲड. जानवी जोशी मुंबई यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दि.23 डिसेंबर रोजी एक लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
ॲड जोशी या उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली करत आहेत. त्यांनी आपल्या आजी सुलोचना जोशी वय 94 वर्ष यांच्या इच्छेनुसार सदरची देणगी दिली आहे. त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या निस्सिम भक्त असून आपल्या आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी देणगी दिली आहे. त्याबद्दल देणगीदार भाविकाचा मंदिर समिती च्यावतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला.

आपल्या आजीची इच्छा नातीने पूर्ण करून, आजी व नाती मधील संबंध दृढ केले आहेत. सुलोचना जोशी यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास देणगी देण्याची इच्छा होती.परंतु काही कारणास्तव मंदिर समितीस देणगी देता आली नाही.पण वकिली व्यवसाय करत असलेल्या त्यांच्या नातीने आपल्या आजीची इच्छा पूर्ण केली आहे. तसेच त्या आपल्या आजीला दर्शनासाठी देखील घेऊन आल्या होत्या.
सद्यस्थितीत नाताळ / ख्रिसमस उत्सव सुरू असल्याने भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. या भाविकांना मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

देणगी देण्यासाठी आरटीजीएस, संकेतस्थळ व मोबाईल ॲप बरोबर नव्याने क्यूआर कोड ची संगणक प्रणाली विकसित केली असून या प्रणाली द्वारे कोड स्कॅन करून मंदिर समिती थेट देणगी देता येणार आहे तसेच देणगी प्राप्त झाल्याची व्हाट्सअप द्वारे पावती देखील तात्काळ मिळत आहेत. देणगीदार इच्छुक भाविकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संत तुकाराम भवन येथील कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन मंदिर समितीमार्फत करण्यात आले आहे.
