मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

नगरपालिका प्रशासनाने कमानीची उंची कमी न केल्यामुळे हा बळी गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

लक्ष्मी दहिवडी/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची व स्विफ्ट कारची जोराची धडक झाल्याने यामध्ये उमेश अशोक आवताडे ( वय 39 रा.खंडोबा गल्ली ) यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस हवालदार दौलतराया तळवार,अज्ञात एकजण असे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 रोजी पहाटे 1.17 वाजता घडली असून याची मंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा शहरातून दि.20 डिसेंबर रोजी रात्री 1.17 वाजता ऊसाने भरलेला ट्रॅक्टर नं.एम.एच.45 ए.एल.6915 हा स्विफ्ट कार नं.एम.एच.12 जे.के.3825 या दोन्ही वाहनांची धडक झाल्याने उमेश आवताडे हे मयत झाले तर कारमधील पोलीस हवालदार दौलतराया तळवार व अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.यामध्ये पोलीस हवालदार तळवार यांच्या पायास,डोक्यास, पोटास,हनुवटीवर मार लागला असून त्यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. अनोळखी व्यक्तीस डोक्यास,शरिरास गंभीर जखमी झाल्या आहेत तो कार मध्येच अडकला होता. अपघाताची माहिती कळताच पोलीसांनी जावून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले. हा अपघात वीरशैव मंगलकार्यालयासमोर झाला आहे. या अपघातानंतर अज्ञात ट्रॅक्टर चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले. याची खबर पोलीस नाईक कृष्णा जाधव यांनी पोलीसात दिली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी इंग्लिश स्कूलच्या गेट समोर ऊसाची दोन वाहने पलटी झाल्याची घटना होवूनही नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प असल्यामुळेच हा बळी गेल्याची तक्रार नागरिकांची आहे.यापुर्वी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी लोकांच्या बळीची वाट पाहत आहेत काय ? या मजकूराखाली वृत्त येवूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याने शहरवासीयांतून प्रशासना विरुध्द संतापाची लाट उसळली आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का ? कमानीची उंची कमी करुन अवजड वाहने शहरातून बंद करणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top