मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/१२/२०२४ : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा शहराकडे बेकायदा गुटखा घेवून येणारे वाहन अन्न औषध प्रशासन व मंगळवेढा पोलीस यांनी सापळा लावून पकडले असून यामध्ये 27 लाख 03 हजार 400 रुपये किंमतीचे वाहनासह मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी संदीप रामचंद्र लाड रा.सांगली,भुषण होमकर रा. पंढरपूर,संतोष वेदपाठक रा.पंढरपूर या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.13 रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान कर्नाटक राज्यातून वाहनाव्दारे मोठ्या प्रमाणात मंगळवेढ्याकडे गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पो.नि.महेश ढवाण यांना मिळताच त्यांनी पोलीसांचे पथक दु.3.30 वाजता मरवडे मार्गावरील रिलायन्स पेट्रोप पंपाजवळ पाठविले असता अशोक लेलँड दोस्त प्लस कंपनीचे वाहन नंबर एम.एच.13 डी.क्यू.9561 तसेच एम.एच.13 डी.क्यू. 8395 ही दोन वाहने समोरुन येताच पोलीस हवालदार महेश कोळी यांनी इशारा करुन थांबविले.
त्यावेळी चालकाला नाव विचारले असता संदीप लाड रा. चिंतामणी नगर सांगली असे तर दुसर्या वाहन चालकाने भूषण होमकर व संतोष वेदपाठक रा.पंढरपूर असे सांगितले. सदर वाहनात काय माल आहे ? असे पोलीसांनी विचारले असता प्रथमत: उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांना पोलीसांनी विश्वासात घेवून विचारल्यावर दोन्ही वाहनात गुटखा व सुगंधी तंबाखू असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त करुन पोलीस स्टेशन आवारात आणून लावली आहेत.
एम.एच.13 डी.क्यू.9561या वाहनात विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू,आरएमडी पान मसाला,सुपर जेम पान मसाला, एम सुगंधी तंबाखू,एस.पी.999सुगंधी असा एकूण 13 लाख 72 हजार 800 रुपयाचा असा मुद्देमाल मिळाला तर दुसरे वाहन क्रमांक एम.एच.13 डी.क्यू.8395 यात जाफरानी जर्दा सुगंधी तंबाखू 290 पाकीटे ज्यांची किंमत 33 हजार 600 असा माल मिळून आला.याची फिर्याद अन्न व औषध प्रशासनाचे उमेश भुसे यांनी दिल्यावर वरील तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.याचा अधिक तपास करीत आहेत.
महाराष्ट्रात गुटखा विक्री व साठा करण्यास बंदी असतानाही मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात हॉटेल व पान टपर्यावर खुले आम गुटखा विक्री सुरु असल्याचे सर्वसामान्यांच्या निदर्शनास येत आहे मात्र कारवाईची सर्वस्वी जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असताना संबंधीत अधिकारी मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी असूनही त्यांच्या निदर्शनास गुटखा कसा काय येत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून येत आहे. दामाजी चौकात यापुर्वी कारवाई केलेल्या ठिकाणीही उघडपणे गुटखा विक्री सुरु असतानाही त्याकडे संबंधीत अधिकार्याचे डोळेझाक होत असल्याने राज्यात गुटखा बंदी असूनही कुचकामी अधिकार्यामुळे हे सर्व घडत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.सोलापूर येथील अन्न भेसळचे आयुक्त यांनीच गांभीर्यपुर्वक लक्ष घालून शहर व ग्रामीण भागातील गुटखा हद्दपार करावा. माजी गृहमंत्री कै.आर.आर. पाटील यांनी युवा पिढीचे आयुष्य बर्बाद होवू नये या उदात्त हेतूने राज्यात गुटखा बंदी आदेश जारी केला मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्या योजनेच्या अंमलबजावणी बाबतच शंका निर्माण झाली आहे.
